लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लॉकडाऊनआधी ज्या शेतातून एक ते सव्वा लाख मिळवले आणि ज्यातून अजून ६०-७० हजारांची मिळकत होऊ शकली असती, त्या शेतात नाईलाजाने एका शेतकऱ्याला बैल सोडावे लागले. एरव्ही सडून फेकण्यापेक्षा ते टोमॅटो बैलांना खाऊ घालावे, असा सूज्ञ विचार वर्धा जिल्हातल्या केळापूर गावातील सूरजसिंग बरवाल या शेतकऱ्याने केला.या शेतकऱ्याचे अडीच एकरांचे शेत आहे. यंदा त्यांनी टोमॅटोचे पीक घेतले होते. पीकही भरपूर आले. लॉकडाऊन होण्याआधी त्यांनी या पिकावर लाख-सव्वा लाख कमाईही केली. मात्र लॉकडाऊनने त्यांचे सगळेच गणित बिघडले. टोमॅटोला बाजारपेठ मिळेना. वाहन न मिळाल्याने त्यांना तोडलेले कित्येक हजारांचे टोमॅटो टाकून द्यावे लागले. अशात शेतातील झाडांवर पिकत चाललेले टोमॅटो पाहून त्यांनी निर्णय घेतला आणि रविवार व सोमवारी आपल्या शेतात बैल सोडून त्यांना ते यथेच्छ खाऊ दिले.केळापूरचा हा परिसर भाजीपाला पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे कांद्याचे बीजोत्पादन केले जात असते.