शासनाने अनुदानावर काटेरी तार द्यावा : शेतकऱ्यांची मागणी आजही धूळखात लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : कृषी क्षेत्रात बदलत्या काळानुसार नवनवे बदल झाले. मात्र शेतातील पिकाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना आजही काट्याचा फासाचाच आधार घ्यावा लागत आहे. शेतातील ओलितासाठी मोटचे पाणी, त्यानंतर पाटाचे पाणी, यानंतर विद्युतीकरण झाल्यानंतर पंपाचे पाणी, आता मोटर पंपावर पाण्याची बचत व्हावी म्हणून ठिंबक व तुषार सिंचनाद्वारे ओलित करण्याची पध्दत आली. शेतीची मशागत करण्यासाठी होणारा बैलांचा वापर कमी होवून ट्रॅक्टर आलेत. मजुरांकरवी होणारी पिकाची कापणी आता यंत्राद्वारे होवू लागली तर शेणामातीने लिपलेल्या खळ्यात होणारी पिकाची मळणी थ्रेशरच्या सहायाने होण्यास सुरुवात झाली. नंतर हंडबा आला आता तर हर्विस्टरच्या सहाय्याने कापणी व मळणी एकाच वेळेस होवू लागली. शेतीत यांत्रिकीकरण झाले तरी पिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच आहे. शेतात बियाणे पेरल्यापासून तर पीक हातात येईपर्यंत मोकाट जनावर आणि वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. ताराच्या कुंपणाची अनेकदा श्वापदांकडून नासधुस केली जाते. याला खर्चही बराच येतो. यामुळेच पुर्वापार सुरू असलेली शेतीची रक्षण करण्याची पध्दत तंत्रज्ञानाच्या युगातही कायम आहे. शेतकऱ्यांना काट्याच्या फासाचाच आधार घ्यावा लागत आहे. यामुळे शेतात गेल्यावर पायाला काटा रुतण्याच्या प्रकारापासून सुटका झाली नसल्याचे तेवढेच खरे आहे. काय असतो काट्याचा फास रब्बी पिकांची मळणी होताच शेताच्या बांधावर असणाऱ्या बोरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. त्या एकावर एक अशा रचून ठेवल्या जाते. जांभुळवाहीला सुरुवात होताच तो फास शेताच्या बांधावर ठेवावा लागतो. शेतात पेरणी झाल्यानंतर चांगला पाऊस येताच खड्डे करून एक-एक करीत काटेरी फांदी फसवित गुंफल्या जाते. या कुंपणाला ग्रामीण भाषेत कुप असे देखील म्हणतात. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज जिल्हापरिषद अंतर्गत विविध योजनेच्या माध्यमातून कडबा कटर, पाईप, स्प्रेपंप, ताडपत्री, सायकल, शिलाई मशीन, बैलजोडी, बैलगाडी, गायी, शेळ्या आदीकरिता अनुदान देण्यात येते. त्यातच शेताला कुंपणासाठी लागणारा काटेरी ताराचा या योजनेत समावेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास ते शेतकरी हिताचे ठरणार असल्याचे बोलले जाते.
शेताच्या कुंपणाला काट्याचा आधार
By admin | Published: July 06, 2017 1:21 AM