शासकीय मदतीची मागणी : दहा ते बारा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क वडनेर : नजीकच्या भिवापूर शिवारामधील फुकटा नाल्यावरील दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले होते. परंतु, मुसळधार झालेल्या पावसामुळे बंधाऱ्याची मागील भिंत खचली. परिणामी, परिसरातील दहा ते १२ शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले. याप्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी आहे. फुकटा नाल्यावरील दोन बंधाऱ्याच्या कामांना शासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. पूर्ण झालेल्या या बंधाऱ्याची मागील भिंत अचानक झालेल्या मुसळधार पावसात खचली. त्यामुळे परिसरातील १० ते १२ शेतकऱ्यांच्या शेतात १ ते २ फुटापर्यंत पाणी साचले होते. शेतकरी जानराव मडावी व वाल्मिक मेश्राम यांच्या शेतातील पीक जास्त पाण्यामुळे सडली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बंधाऱ्यात जास्त पाण्याची साठवण झाल्याने त्याची मागील भिंत खचल्याची चर्चा परिसरात आहे. सध्या या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नुकसानग्रस्त शेतकरी जानराव मडावी, डोमाजी मेश्राम, अशोक कळसकर, चंदू राऊत, सुदाम कळसकर, हनुमान राखुंडे, माधव कुडमथे यांच्या शेतीच्या नुकसानीची संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून त्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी आहे. पुर्वीच यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात.
बंधारा फुटला; पाणी शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:41 AM