वर्धा : देशात दोन राज्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात नेते मंडळी मशगुल आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाशी सामना करीत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी व सुल्तानी संकट कोसळले आहे. केंद्र सरकारने अद्याप कृषी मालाला योग्य भाव मिळेल असे कोणतेच धोरण राबविले नसल्याने आणि जागतिक बाजारत होणारी भावाची गहसरण पाहता शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील हंगामात कापूस ५ हजार रुपये प्रती क्विंटल व सोयाबीन ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल विकणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात यापेक्षा कमी भाव मिळण्याचे संकेत आहे. यंदा कापूस ३ हजार ५०० ते ४ हजार प्रती क्विंटल तर सोयाबीन ३ हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीन विकावे लागणार असल्याचे संकेत आहे. कारण जागतिक बाजारात झालेली भावाची घसरण याला कारणीभूत असेल. यामुळे आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे. यावर्षी पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे उत्पादन खर्च वाढला. शिवाय उत्पन्न कमी होणार. यातच मालाला भाव कमी मिळणार असल्याने या दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघणार असल्याची स्थिती आहे.शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देणार असल्याची घोषणा करणारे आताचे केंद्र सरकार जुनेच धोरण कायम ठेवत असल्याचे दिसते. सध्या अमेरिकेच्या बाजारात आलेली मंदी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. ती शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारी ठरणार असून याबाबत शासनाने कोणतेच धोरण आखलेले नाही. खरीपातील धान, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना सरकारने जाहीर केलेले हमी भाव ही मिळण्याची शाश्वती नसल्याची परिस्थिती आहे. जागतीक बाजारात मागील वर्षी ९० ते ९५ सेंट प्रती पाऊण्ड रूई चा भाव होता. आज रुईला ७० सेंट पर्यंत भाव मिळत आहे. याचाच अर्थ असा की या हंगामात भारतीय शेतकऱ्यांना सरकारचा हमीभाव ४ हजार ५०० प्रती क्विंटल मिळणार नाही. सोयाबीनच्या भावात ही मंदी आहे. १४.२५ डॉलर प्रती बुशेल म्हणजेच २८ किलो चा भाव आता ९.४० डॉलर वर येऊन ठेपला आहे. आपले सोयाबीन जी.एम. नाही म्हणून थोडे जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपये भाव असण्याची शक्यता आहे. मका पिकाला १ हजार ३१० प्रती क्विंटल पेक्षा कमी भावात विकावा लागत आहे. जागतीक बाजारात साखर २४ रुपये किलो आहे पण येथे ३२ ते ३५ रुपये प्रती किलो आहे. बाजारात हस्तक्षेप करून शेतकरी हित साधने गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढणार
By admin | Published: October 07, 2014 11:39 PM