नियमांना बगल : प्रवाशांच्या जीविताला धोका, महामंडळाचेही होतेय दुर्लक्षवर्धा : दुचाकी, चारचाकी तथा अवजड यापैकी कुठलेही वाहन चालवायचे झाले तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. अन्यथा अपघातांना सामोरे जावे लागते. वाहने चालविताना मोबाईलवर बोलू नये, असा एक नियम आहे; पण या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचेच दिसून येत आहे. यात बस चालकही अव्वल स्थानी असल्याने प्रवाशांचाच जीव टांगणीला लागत असल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चालकांना तंबी देणे गरजेचे झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून शहरांसह ग्रामीण भागात बससेवा पुरविली जाते. सर्वाधिक ग्रामीण भाग जोडणारी वाहतूक व्यवस्था म्हणूनही एसटीकडे पाहिले जाते; पण याच एसटीद्वारे प्रवाशांच्या जीविताशी खेळ होत असेल तर ती वाहतूक व्यवस्था सक्षम कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करू नये, बोलायचे असेल तर वाहन बाजूला उभे करावे, असा वाहतूक नियम सांगतात; पण परिवहन महामंडळाच्या शासकीय बसचे चालकच वाहन चालवित असताना मोबाईलवर बोलत असल्याचे पाहावयास मिळते. वास्तविक, एसटीमध्ये एकटा चालक वा वाहकच नसतो तर त्यांच्यावर बसमधील प्रवाशांचे जीव अवलंबून असतात. यामुळे किमान बस चालकांनी तरी नियमांचे पालन केलेच पाहिजे, अशी अपेक्षा असते; पण हे होताना दिसत नाही. परिवहन महामंडळाचे बहुतांश चालक एसटी चालविता असताना मोबाईलवर बोलताना दिसून येतात. रविवारीही असाच प्रकार एका बसमध्ये आढळून आला. पुलगाव ते वर्धा प्रवासादरम्यान चालकाने तब्बल सहा वेळा मोबाईवर संभाषण केले. देवळी ते वर्धा या २० मिनीटाच्या प्रवासात चालक सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचेच आढळून आले. यातच सावंगी (मेघे) येथे थांबा असल्याने वाहकाने वाजविलेली घंटीही सदर चालकाला ऐकू आली नाही. वाहकाला पुन्हा घंटी वाजवून बस थांबविण्याचा इशारा करावा लागला. यानंतर तर मोबाईलवर संभाषण थांबेल, असे वाटत होते; पण वर्धा शहरातील गजबजलेला दयालनगर परिसरातील रस्ता आला तरी चालकाचे मोबाईलवर बोलणे सुरूच होते. दरम्यान, सुदैवाने कुठला अनुचित प्रकार घडला नाही; पण एसटीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्नच आहे. दुचाकी चालविताना मोबाईवर बोलताना आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते; पण परिवहन महामंडळाच्या बसेसवर सहसा कारवाई केली जात नसल्याचेच दिसते. बोटावर मोजता येईल इतक्याच बसेस व त्यांच्या चालकांवर आजवर कारवाई झालेली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी चालकांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत वारंवार सूचना दिल्या जातात; पण या सूचनांचे पालन चालक, वाहक करीत नसल्याचेच दिसून येते. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चालक वाहन चालवित असल्याचे कळल्यास मोबाईल बंद करा, नंतर बोलू, असे सांगणे गरजेचे असते; पण ते देखील तत्सम सूचना न देता संभाषण करीत असल्याचेच दिसून येते. रविवारी एसटी चालकाचे मोबाईलवर सुरू असलेले संभाषण खासगी नव्हते तर कार्यालयीन असल्याचेच त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसून येत होते; पण सुमारे सहा कॉलपर्यंत ते थांबले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. राज्य परिवहन महामंडळाकडून अपघात विरहित वाहतूक व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले जातात; पण त्या धोरणाला परिवहनचे चालकच सुरूंग लावत असल्याचे या घटनांवरून दिसून येते. यापूर्वी अनेकदा चालक मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवितानाही आढळून आले आहेत. या चालकांवर कारवाई केली जाते; पण इतर चालक ती गांभीर्याने घेत नसल्याचेच यावरून दिसून येते. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चालकांना तंबी देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)अपघात विरहित प्रवासी वाहतुकीला चालकांचेच आव्हानराज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी मनाशी ठरविल्यास बसला कधीही अपघात होणार नाही; पण यासाठी चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असते. परिवहन महामंडळाकडूनही तत्सम प्रयत्न केले जातात. अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव केला जातो. यातून अन्य चालकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनीही मद्यधुंद अवस्थेत वा मोबाईलवर बोलत वाहन चालविणे टाळावे, अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी हा त्या मागील उद्देश असतो; पण चालक यालाही दाद देत नसल्याचेच वारंवार समोर येणाऱ्या प्रकारांवरून दिसून येते. पुलगाव ते वर्धा मार्गावर चालकाचे मोबाईलवरील संभाषण ही रविवारची पहिलीच घटना नव्हे. यापूर्वीही पुलगाव ते वर्धा, आर्वी ते वर्धा तथा पुलगाव ते आर्वी प्रवासादरम्यान चालक मोबाईलवर बोलताना आढळून आले आहेत. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे बस चालकांना कसलेही देणेघेणे नसते, असेच दिसते. याच प्रकारांमुळे अनेकदा अपघातही झाले आहेत; पण ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. अपघाताचा धोकावाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, कॉल रिसिव्ह करणे आणि विशेषत: अॅण्ड्रॉईड मोबाईलवर हे प्रकार करणे अपघाताना निमंत्रण देणारेच आहेत. आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षाउपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय तथा वाहतूक पोलिसांनी वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असलेल्या चालकांवर कारवाई करणेच अगत्याचे झाले आहे. अत्यंत कठोर नाही; पण किमान दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यास चालकांत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
बसचालक मोबाईलवर व्यस्त
By admin | Published: March 06, 2017 1:03 AM