देवकांत चिचाटेलोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे तब्बल पाच महिने एस.टी.ची चाके जागीच थांबली होती. यंदाही कोरोनाने कहर केल्याने तब्बल ४५ दिवस एस.टी.ची प्रवासी वाहतूक बंद होती. याचा बसस्थानक आणि बसगाड्यांमध्ये पॉपकॉर्न, खारे दाणे व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही मोठा फटका बसला. अनलॉकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत होत असल्याने संसाराची गाडीही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आगारातून दररोज २१५ फेऱ्या होत आहेत. बसस्थानकावर असलेल्या स्नॅकबारसह इतर भाड्यापोटी महामंडळाला १५ हजार ४५८ रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने मागील वर्षी तब्बल पाच महिने, तर या वर्षी दीड महिना एस.टी. बंद होती. यामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. आता एस.टी. सुरळीत सुरू झाल्याने आर्थिक घडी पूर्वपदावर येत आहे.
खाद्यपदार्थांची विक्री करून कुटुंबाचा अनेक वर्षांपासून उदरनिर्वाह करतो. मात्र, कोरोनामुळे व्यवसायावर संकट ओढवले होते. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता व्यवसाय सुरू झाल्याने संसाराचा गाडाही सुरळीत होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने एस.टी.ची चाके थांबली होती. यामुळे आमच्या व्यवसायावरही गदा आली. या काळात प्रचंड आर्थिक ओढाताण झाली. अनलॉकनंतर आता व्यवसाय सुरळीत झाला आहे.
एस.टी. महामंडळाला द्यावे लागते शुल्क- पुलगाव येथील बसस्थानकावर चार परवानाधारक विक्रेते आहेत. बसस्थानकाच्या प्रशासनाकडून चारही परवानाधारकांकडून मासिक भाडे घेतले जाते.- स्नॅक बारचे भाडे नऊ हजार ९५६, जनरल विक्री भाडे तीन हजार ३५१, परवानाधारक हॉकर्सकडून १२०० रुपये भाडे, तर खारे दाणे विक्री परवान्याचे ९५१ रुपये भाडे आहे.