लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य भाजीबाजारातून भाज्या आणताना सर्वाधिक प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग केला जातो. परंतु बंदीमुळे प्लास्टिक पिशव्यांवर संक्रांत आली. त्यामुळे नायलॉन पिशव्या विकण्याचा नवा उद्योग भाजीबाजार परिसरात सुरू झाला आहे.शहरात बसस्थानक परिसरात मुख्य भाजीबाजार आहे. सर्वच दृष्टीने हा भाग जवळ असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. कामे आटोपून भाजी खरेदी करण्याला बहुतेक जण प्राधान्य देतात. अशात प्रत्येक वेळी कापडी पिशवी जवळ बाळगणे नागरिक टाळत होते. परिणामी दोन रुपयाची कोथिंबीर घेतल्यावरही प्लास्टिक पिशवी मागण्याची सवय ग्राहकांना झाली होती. त्यामुळे शहरात प्लास्टिक कचरा खूपच वाढू लागला होता. हे प्लास्टिक पातळ असल्याने एकदा वापरल्यावर ते लगेच फाटते. परिणामी नाल्यांमध्ये त्याचा खच साचत होता.ही बाब लक्षात घेत तसेच प्लास्टिक वापराला आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. या कारणाने उघडपणे मिळत असलेली प्लास्टिक पिशवी आता बंद झाली. परंतु ग्राहकांची घरून पिशवी नेण्याची सवय मोडल्याने भाजी घरी कशी न्यावी असा प्रश्न आजही ग्राहकांना पडतो. याच कारणाने भाजी विक्रेत्यांनीच नायलॉन पिशव्या विकण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. तसेच पिशव्या विक्रेतेही परिसरात पहायला मिळतात.आजही बरेच ग्राहक भाजीबाजारात प्लास्टिक पिशवी मागतात. परंतु विक्रेते प्लास्टिक पिशवी नसल्याचे भासवत विक्रीस ठेवलेल्या नायलॉन पिशवीकडे बोट दाखवतात. ग्राहकांनाही नाईलाजाने का होईना नायलॉन पिशवी खरेदी करावी लागते. या बंदीमुळे नायलॉन व कापडी पिशवी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. अद्यापही अनेकांना घरून कापडी पिशवी नेण्याची सवय नाही. त्यामुळे असे नागरिक सध्या पिशवी खरेदीचे ग्राहक बनत आहे.कापडी पिशवी मात्र नामशेषप्लास्टिक बंदीचे अनेकांनी स्वागत केले असले तरी पिशव्या घरून आणण्याची सवय लागायला वेळच लागणार आहे. या कारणाने भाजीबाजार परिसरात नायलॉन पिशवी विक्रेते सक्रीय झाले आहे.नायलॉन पिशवीतही प्लास्टिक हा घटक असतोच. त्यामुळे अशा पिशव्या खराब झाल्यास त्याचेही विघटन होत नाही. यावर उपाय म्हणून सुती कापडाच्या पिशव्या वापरात आणने गरजेचे आहे.पूर्वी घरीच महिला कापडी पिशव्या शिवत असे. त्यामुळे कामात नसलेल्या कापडाचा उपयोग अशा कामात होत होता. आता मात्र अशा पिशव्या घरी तयार करणे जवळपास हद्दपार झाल्याने कापडी पिशव्या नामशेष होत आहे.भाजी विक्रेत्यांसाठी दुहेरी व्यवसायप्लास्टिकच्या अतिवापरामुळे आणि ते सहज कुठेही, कोणत्याही वस्तूची विक्री करताना सहज मिळत असल्याने या काही वर्षात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे प्रमाण खूपच वाढले आहे. भाजीबाजारातही या पिशव्यांचे वर्चस्व होते. परंतु प्लास्टिक पिशवीकरील बंदीने आता भाजीविक्रेत्यांनी सरळ नायलॉन पिशव्याच विक्रीस ठेवल्या आहे.बहुतेक जण आजही घरून पिशव्या आणत नाही. त्यामुळे येथूनच त्यांना नायलॉन पिशवी घ्यावी लागते. त्यामुळे भाजीबाजारात प्रत्येक भाजीविक्रेत्याजवळ नायलॉन पिशव्या विक्रीसाठी अडकविलेल्या दिसतात. १०, २० रुपयांना त्या विकल्या जात आहेत.गृहिणीच्या हाती पुन्हा पिशवीप्लास्टिकचा खरा हव्यास महिला वर्गामध्ये आजही पहावयास मिळतो. अनेकदा भाजीविक्रेत्यांना त्या जास्तीची प्लास्टिक पिशवी मागतात. एखाद्याने पन्नी नाही असे सांगितल्यास त्या दुकानदारापासून भाजीच न घेण्याचा हेकाही महिला धरायच्या. परंतु त्याच महिला आता आवर्जून घरून कापडी पिशवी आणत असल्याचे त्यांच्या हातात असलेल्या कापडी तसेच नायलॉन पिशव्यांवरून दिसते.
पिशव्या विक्रीच्या व्यवसायाला तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:54 PM
नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य भाजीबाजारातून भाज्या आणताना सर्वाधिक प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग केला जातो. परंतु बंदीमुळे प्लास्टिक पिशव्यांवर संक्रांत आली. त्यामुळे नायलॉन पिशव्या विकण्याचा नवा उद्योग भाजीबाजार परिसरात सुरू झाला आहे.
ठळक मुद्देप्लास्टिक बंदी : कापडी पिशव्यांच्या पथ्थ्यावर