संस्कार अॅग्रोमधील कामगारांचे दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : नजीकच्या संस्कार अॅग्रोमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक कामावरून कमी करण्यात आले. अशाच प्रकारे जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. सदर प्रकार कामगारांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून संस्कार अॅग्रोमधील कामगारांनी प्रहारच्या नेतृत्त्वात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन मंगळवारी दुसऱ्याही दिवशी सुरूच होते. संस्कार अॅग्रोमध्ये कार्यरत कामगार विनोद राऊत याला कुठलीही पूर्व सूचना न देता सोमवारी कामावरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अचानक कुठलेही कारण न सांगता कामगाराला कामावरून कमी करणे हे चुकीचे असून कामावरून कमी करण्यात आलेल्या विनोद राऊत याला तात्काळ कामावर घेण्यात यावे तसेच स्थानिकांना कंपनीत रोजगार द्यावा या मागणीसाठी संस्कार अॅग्रोमधील ३५० कामगारांनी प्रहारच्या नेतृत्त्वात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची माहिती मिळताच आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळी पोलिसांनी आंदोलनस्थळी डेरा टाकला आहे. सोमवारी कामगार अधिकारी धुर्वे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांची मागणी जाणून घेतली. परंतु, यावेळी समाधानकारक तोडगा न निघाल्याने मंगळवारीही सदर आंदोलन सुरूच होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर, कल्पना नगराळे, छाया नगराळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले आहेत. कामगारांच्या मागण्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी आहे.
कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारला एल्गार
By admin | Published: May 10, 2017 12:46 AM