वर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पुलगाव येथून दुचाकी चोरून वर्ध्यात दुचाकी विकायला येणाऱ्या चोरट्यांना अटक करून दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. ही कारवाई ७ रोजी दयालनगर परिसरातील रेल्वे प्रवेशद्वारासमोर करण्यात आली.कौशिक बिजेश तिवारी, राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, पुलगाव परिसरात दुचाकी चोरींच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार चोरट्यांचा आणि दुचाकींचा शोध पोलिसांकडून कसोशीने घेतला जात होता. दरम्यान पोलिस पथकाला चोरीची दुचाकी विकण्यासाठी दयालनगर परिसरात चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दयालनगर परिसरात सापळा रचला असता एका दुचाकीवर दोन संशयित व्यक्ती बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव कौशिक तिवारी आणि दुसरा अल्पवयीन दोघही भीमलाइन पुलगाव असे सांगितले. दुचाकीबाबत विचारणा करून पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी दुचाकी पुलगाव परिसरातून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी समांतर तपास करून पुलगाव परिसरातून सात चोरीतील दुचाकी विविध ठिकाणाहून हस्तगत केल्या.
तसेच चोरीतील दुचाकी विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुयल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, रामदास खोत, मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, अक्षय राऊत, शिवकुमार परदेशी, गणेश खेवले यांनी केली.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यतापुलगाव हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीचे सातही गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.