वर्धा : जिल्ह्यातील ११३ ग्रामपंचायतींच्या रणसंग्रामाची अखेरची घडी काही तासांवर आली आहे. रविवारी सर्वत्र ग्रामपंचायतीकरिता ‘मतोत्सव’ होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणाली सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील ३४७ मतदान केंद्रावर रविवारी एकाच वेळी मतदार होणार असल्याने शनिवारी या सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व पोलिस कर्मचारी अशा एकूण १ हजार ८७४ कर्मचाऱ्यांची चमू रवाना होणार आहे.
आठही तालुक्यांतील ११३ ग्रामपंचायतींमधील सरपंचासह ३४२ वॉर्डांतून ८४५ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. मतदानापूर्वीच सात सरपंच आणि १५४ सदस्य अविरोध निवडून आले. आता उर्वरित सरपंच आणि सदस्यांकरिता रविवारी मतदार प्रक्रिया राबविली जाणार आहे. सरपंचाकरिता ३४० तर सदस्यांकरिता १ हजार ४७८ आपले भाग्य अजमावत आहे. आजपर्यंत मतदारांच्या दारोदारी जाऊन मत मागितले; परंतु आता खुल्या प्रचाराला ब्रेक लागला असून मतदारांचा कौल रविवारी कळणारच आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम मशीन आणि कर्मचारीही सज्ज केले आहे. उद्या शनिवारी सायंकाळपर्यंत सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रावर दाखल होणार आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.
शक्तिप्रदर्शनातील गर्दीसाठी वाट्टेल ते...
रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार असल्याने शुक्रवारी सायंकाळी जाहीर प्रचाराला ब्रेक लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. वर्ध्यालगतच्या पिपरी (मेघे) ग्रामपंचायत परिसरातही दोन्ही पॅनलकडून सकाळी वाजतगाजत रॅली काढली. यामध्ये एका रॅलीत जिल्ह्यातील इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यामुळे रॅलीत गर्दी गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत व तालुक्याच्या बाहेरील कार्यकर्ते व नेते बोलावल्याची खमंग चर्चा रंगली होती.
सोशल मीडियावरील फलक कायमच!
शुक्रवारी सायंकाळी प्रचाराला पूर्णविराम मिळाल्याने निवडणूक परिसरातील सर्व फलक काढणे आवश्यक आहे. तसेच कुणालाही जाहीररीत्या प्रचार करता येत नाही. असे असले तरीही सोशल मीडियावरून उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू होता. या सोशल मीडियाच्या प्रचारावरही निवडणूक यंत्रणेचा वॉच असून वेळेप्रसंगी कारवाईचा दंडुका उगारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या
एकूण कर्मचारी संख्या-१,८७४
केंद्राध्यक्ष-३४७
मतदान अधिकारी-१,०४१
१० टक्के राखीव-१३९
पोलिस कर्मचारी-३४७
एका केंद्रावर एक पोलिस कर्मचारी
जिल्ह्यातील ३४७ केंद्रावरून मतदान होणार असल्याने या केंद्रावर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. याशिवाय संबंधित मतदार केंद्रातील पोलिस स्टेशनचे ठाणेदार, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची यांची गस्त सुरू राहणार आहे.
मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची आकडेवारी
तालुका - मतदान केंद्र - केंद्राध्यक्ष - मतदान अधिकारी - राखीव - पोलिस
- वर्धा - ४९ - ४९ - १४७ - २० - ४९
- सेलू - ६७ - ६७ - २०१ - २७ - ६७
- देवळी - ३५ - ३५ - १०५ - १४ - ३५
- आर्वी - ७५ - ७५ - २२५ - ३० - ७५
- आष्टी - १८ - १८ - ५४ - ०७ - १८
- कारंजा - ४९ - ४९ - १४७ - २० - ४९
- हिंगणघाट - ३३ - ३३ - ९९ - १३ - ३३
- समुद्रपूर - २१ - २१ - ६३ - ०८ - २१