निकृष्ट कामांची पावती : शेतकऱ्यांचेही नुकसान वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती ओलिताखाली आणता यावी, उद्योगांनाही पाणी मिळावे या हेतूने निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ महत्प्रयासाने निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण तर झाला; पण अद्यापही कालव्याचे काम रेंगाळलेले आहे. ‘पूढचे पाठ, मागचे सपाट’ याप्रमाणे ही कामे सुरू असून पूर्ण होण्यापूर्वीच कालवा नादुरूस्त होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ या प्रकल्पातून निघणारा मुख्य कालवा रोहणा, सोरटा, पुलगाव या गावांतून पूढे यवतमाळ जिल्ह्यातील गावांपर्यंत जोडण्यात आला आहे़ या कालव्याची कामे विविध कंपन्यांना देण्यात आली आहेत़ यात देवळी तालुक्यातील बहुतांश काम घेतलेली कंत्राटदार कंपनी योग्यरित्या बांधकाम करीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. पडेगाव येथे बांधकाम सुरू असतानाच कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते़ अद्यापही हा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही़ असे असताना पुलगाव शहरात अनेक ठिकाणी या कालव्यात सिमेंटीकरण झालेल्या भागात गवत व अन्य वनस्पती उगवल्याचे दिसते़ शिवाय अनेक ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे काम अर्धवटच करण्यात आलेले आहे़ यामुळे खोदकामही पुन्हा करावे लागत असल्याचे चित्र आहे़ कित्येक वर्षांपासून सुरू असलेले कालव्याचे काम अनेक दिवस निधीमुळे रेंगाळले तर अनेक ठिकाणी कंत्राटदार कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे रेंगाळल्याचे दिसते़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत सदर कंत्राटदार कंपनीला जाब विचारावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी, अशी मागणी होत आहे़ शिवाय कालव्याच्या बांधकामाचा दर्जा राखला जावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देत कालवा पूर्ण करून घेणेच गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी) निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा अनेक ठिकाणी बांधकाम पूर्ण करून सज्ज असला तरी पुलगाव शहरातून जाणारा भाग मात्र केवळ खोदकामापूरताच मर्यादित राहिला आहे. अद्यापही पुलगाव परिसरातील कालव्याचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही. शिवाय धनोडीकडील काही भागात कालव्याचे काँक्रीट उखडत असल्याचेही पाहावयास मिळते. २५ वर्षांनी प्रकल्प पूर्ण झाला. आता कालव्याला ३० वर्षे लागतील काय, असा संतप्त सवाल अनेक गावांतील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
काम पूर्ण होण्यापूर्वीच कालव्याची दुरवस्था
By admin | Published: April 17, 2017 12:42 AM