मराशिपची मागणी: शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत शिक्षण आयुक्त, पुणे यांनी ११ आॅगस्ट २०१६ रोजी निर्गमित केलेले आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) डुरे यांच्यामार्फत आयुक्ताांना केली. सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार राज्यभर अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांच्या समायोजनाचा कार्यक्रम शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार १६ ते २४ आॅगस्ट या कालावधीत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांध्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच आक्षेपार्य बाबी असल्यामुळे आयुक्तांचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेमधील घोळ अद्याप संपलेला नाही. त्यातील त्रृटी दुरूस्ती करिता १० आॅगस्ट रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी शिबिराचे आयोजन केले. परंतु त्रृटीची दुरूस्ती करण्यापूर्वीच समायोजनाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. तसेच सत्र २०१६-१७ मध्ये सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरवून कार्यवाही करणे नियमबाह्य असून संच मान्यतेबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.१६ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी यांनी प्रकाशित केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये आरक्षण, कार्यभार लक्षात घेता सेवाज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आलेले आहे. परंतु एमईपीएस १९८१ च्या नियम २६ (२) नुसार सेवा कनिष्ठ शिक्षकांऐवजी सेवाज्येष्ठ शिक्षकांना अतिरक्त ठरविताना शिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. याचे पालन न करता संस्था, स्तरावर कोणत्याही नियमाचे पालन न करता बऱ्याच शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आलेले आहे.२० आॅगस्ट पर्यंत हरकती घेऊन २२ आॅगस्ट पर्यंत शिक्षणाधिकारी यांना त्यावर निर्णय घ्यायचा आहे. दोन दिवसात शेकडो शिक्षकांच्या हरकती निकाली काढताना शिक्षकांना न्याय देणे होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तांचा समायोजन कार्यक्रम शिक्षकांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी समितीचे कार्यवाह अजय भोयर, मनोहर वाके, अनिल टोपले, अजय भोयर, पुंडलिक नागतोडे, रवी कोठेकर, विजय चौधरी, विजय भोयर, मनोज मोहता, अशोक तवले, सुनील गायकवाड, मधुकर जोशी, कुंडलिक राठोड, रत्नाकर निखारे, बंडू कोपरे, झाडे, अभिजित घाईत, अशोक झोटींग, रवींद्र राठोड, रूपेश चिडे, राहुल तराळे, निलेश बढे, आशिष लोढे, भोजराज जाधव, सोनकुसरे, जाधव उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचे आदेश रद्द करा
By admin | Published: August 21, 2016 12:36 AM