लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल हॉस्पिटलचा श्रीगणेशा रविवार, १३ फेब्रुवारीला केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. हे नवीन कॅन्सर हॉस्पिटल विदर्भासह विदर्भाबाहेरील रुग्णांसाठी लोकाभिमुख ठरेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.डॉ. बोरले पुढे म्हणाले, कर्करोग या विषयाचा विचार केल्यास दक्षता म्हणून जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार, तसेच उपचारानंतर रुग्णाला माणुसकी जोपासत धीर देणे हे गरजेचे आहे. या नवीन कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून या चारही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून रुग्णसेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.पत्रपरिषदेला विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. ललित वाघमारे, डॉ. जॉर्ज फर्नांडिस, डॉ. नितीन भोला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रत्येक वर्षी जगात २ कोटी तर जिल्ह्यात दोन हजार नवे कर्क रुग्ण सापडतात : डॉ. संदीप श्रीवास्तव- प्रत्येक वर्षी जगात २ कोटी नवीन कर्क रुग्ण सापडतात. त्यामुळे कर्करोगावरील वेळीच निदान व उपचार हे सध्याच्या विज्ञान युगात महत्त्वाचेच आहेत. वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास वर्धासारख्या छोट्या जिल्ह्यात वर्षाला किमान दोन हजार नवीन कर्क रुग्ण ट्रेस होतात. वर्ध्यासह विदर्भातील कर्क रुग्णांसाठी हे नवे रुग्णालय दिलासा देणारेच ठरणार असल्याचे डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.कॅन्सर हॉस्पिटल १२० रुग्णखाटांचे : डॉ. नितीन भोला- रविवारी श्रीगणेशा होत असलेले कॅन्सर हॉस्पिटल एकूण १२० खाटांचे आहे. यात ८० जनरल रुग्णखाटा असून या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर राहणार आह. शिवाय तीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान बहुधा रुग्णाच्या शरीरातील बेकार झालेला भाग कापावा लागतो. बहुधा प्लास्टिक सर्जरी करावी लागते. त्यामुळे या नवीन हॉस्पिटलमध्येच वेगळ्या प्लास्टिक सर्जरी कक्षही असल्याचे डॉ. नितीन भोला यांनी सांगितले.
महिनाभर राबविणार विशेष तपासणी शिबिर : अभ्युदय मेघे- रविवारी श्रीगणेशा होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन टप्प्यांत विशेष तपासणी शिबिर विदर्भातील सहा जिल्ह्यांत घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शिबिर घेतले जाणार असून, त्यामुळे वेळीच नवीन कर्क रुग्ण ट्रेस होत त्यांना वेळीच चांगला उपचार मिळणार असल्याचे याप्रसंगी अभ्युदय मेघे यांनी सांगितले.लोकार्पणास गडकरींसह यांची राहणार उपस्थितीनव्या सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह कुलपती दत्ता मेघे, पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, आ. पंकज भोयर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, सागर मेघे, आ. समीर मेघे, डॉ. राजीव बोरले, डॉ. ललित वाघमारे, डॉ. संदीप श्रीवास्तव आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.