लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारासाठी संधीची कमाल मर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्यावर आता सहा-नऊच्या संधीचे बंधन आल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमाल संधीची मर्यादा निश्चित करण्याबाबतची घोषणा स्वागतार्ह असून हा निर्णय घेण्याची वेळ चुकलेली आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ही मर्यादा केवळ यूपीएससीपर्र्यंत मर्यादित ठेवते. त्याच सिव्हील सर्व्हिस एक्झामिनेशनप्रमाणे एमपीएससी पण ठेवणार का की एमपीएसीच्या पूर्ण परीक्षेवर निर्बंध घातले जातील? संभ्रम निर्माण झाला आहे.- सागर ढाकुलकर, विद्यार्थी, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय,.
दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेचे टप्प्यांची अडचण आणि कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास, उमेदवारी रद्द झाल्यास ती संख्या मोजली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, हे निश्चितच. म्हणून संधीचे बंधन नसावे, अशी आग्रही मागणी आहे.- अक्षय नारायणराव घोडे, आसोलेनगर, आर्वी.
अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कमाल संधीची मर्यादा हा निर्णय स्वागतार्ह आहे; पण हा निर्णय केवळ महाराष्ट्र राज्यसेवा या परीक्षेला असला तर उर्वरित परीक्षेला मुलांना प्रयत्न करण्याची मुभा मिळेल व केंद्रीय लोक सेवा आयोगाप्रमाणे सीएसएटी हा ३३ टक्के पासिंग असला तर हा निर्णय जास्त हितकारक ठरेल, असे माझे मत आहे.-स्मिता बनसोड, एमपीएससीची तयारी करणारी विद्यार्थिनी. सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, आर्वी.
स्पर्धा परीक्षेबाबत सर्वांना समान निर्णय असावा. या घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होण्याची शक्यता आहे.- संजीवनी ब्राह्मणे, महात्मा फुले अभ्यासिका.
सरकारने स्पर्धा परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. या निर्णयाने आपापसात मतभेद दिसून येतात. या अध्यादेशाचा मी निषेध करतो. - धम्मपाल इंगोले.