प्रशांत हेलोंडे - वर्धादेशातील निवडणुका पारदर्शकरीत्या पार पडाव्या म्हणून निवडणूक आयोगाची रचना केली गेली़ यात केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाचा समावेश आहे़ या आयोगांद्वारे आदर्श आचारसंहिता निर्माण करण्यात आली आहे़ यात उमेदवारावर बंधने घातली असून प्रशासनालाही काही नियम घालून दिले दिले आहेत; पण उमेदवारही चौकटीत राहत नाही आणि प्रशासनही नियम पाळत नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे़ लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च वर्धा निवडणूक विभागाने जाहीर केला नाही आणि आता विधानसभेत रिंगणातील उमेदवारांची संपत्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही़ यावरून निवडणूक यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते़ शिवाय उमेदवाराने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बुडविले तर नाही नाही, याचीही चौकशी केली जाते़ सध्या विधानसभा निवडणुकीचा फड रंगलेला आहे़ निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष अधिसूचना जारी केली जाते़ विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली़ यात २१ ते २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले़ यानंतर छाननी व अर्ज परत घेण्याची प्रक्रिया पार पडून १ आॅक्टोबरला चिन्हवापट व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली़ १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांच्या संपत्तीचा लेखाजोखा मतदारांना उपलब्ध होणे अनिवार्य होते़ यासाठी संबधित विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उमेदवारांचे अॅफिडेव्हिट लावले जाते़ शिवाय संकेतस्थळावरही ते उपलब्ध करून दिले जाते़ लोकसभा निवडणुकीमध्ये वर्धा मतदार संघामध्ये रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांचे अॅफिडेव्हिट मतदारांकरिता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते; पण विधानसभा निवडणुकीत प्रशासनाला यासाठी वेळच मिळाला नसल्याचे दिसून येते़ हा प्रकार केवळ वर्धा जिल्ह्यातच घडतोय, असे नव्हे तर राज्यातील २८८ पैकी शंभरांवर मतदार संघातील उमेदवारांचे अॅफिडेव्हिट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे सदर संकेतस्थळ तपासल्यास दिसून येते़ वर्धा जिल्ह्यातील केवळ हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांचे अॅफिडेव्हिट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे़ उर्वरित आर्वी, देवळी आणि वर्धा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण मतदारांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही़ लगतच्या अमरावती जिल्ह्यातील ३६ धामणगाव (रेल्वे), ३७ बडनेरा, ३८ अमरावती व ३९ तिवसा या चार मतदार संघांतील उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाईन उपलब्ध नाही़ केंद्र आणि राज्य शासनानेच आॅनलाईन सेवेवर अधिक भर दिलेला आहे़ यामुळेच प्रत्येक बाबी संगणकावर उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे़ निवडणूक प्रक्रियेलाही यातून वगळण्यात आलेले नाही़ यामुळे निवडणुकीचे तपशीलही संकेतस्थळावर देणे बंधनकारक करण्यात आले आहे़ शिवाय निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर झालेला खर्चही सादर करावा लागतो़ असे असले तरी लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च वर्धा निवडणूक विभागाच्यावतीने अद्यापही सादर करण्यात आलेला नाही़ आॅनलाईन सेवेचा गवगवा केला जात असताना महत्त्वाच्या निवडणुकांचा तपशील अद्याप देण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील १४ उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण असलेले ‘अॅफिडेव्हिट’ ‘अपलोड’ केले जाऊ शकते तर अन्य मतदार संघातील का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ वर्धा विधानसभा मतदार संघात २९, देवळी मतदार संघात १९ आणि आर्वी मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात आहेत़ यातील किती उमेदवार कोट्यधीश, किती लक्षाधीश आहे, कुणाकडे कोणती संपत्ती अधिक आहे, ही माहिती अॅफिडेव्हिटमधून मतदारांना मिळते़ शिवाय कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत, कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली वा निर्दोष मुक्तता झाली, कोणते प्रकरण न्यायालयात आहे, हे कळते; पण अद्यापही अॅफिडेव्हिट अपलोड करण्यात आलेले नाही़ प्रत्येक मतदार निवडणूक कार्यालयात जाऊन अॅफिडेव्हिट तपासू शकत नाही़ यामुळे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे़
उमेदवारांची संपत्ती अद्यापही ‘आॅफलाईन’
By admin | Published: October 07, 2014 11:39 PM