रवींद्र चांदेकर, वर्धा: लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर आता वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, वर्धा तालुक्यातील सर्वाधिक आठ, तर आर्वी तालुक्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे.
लोकसभेसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सोमवार, ८ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी २६ पैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणत २४ उमेदवार उरले आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील तीन आणि अमरावती जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील आठ, आर्वी तालुक्यातील चार, तर समुद्रपूर, देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीचे उमेदवार देवळी, तर महाविकास आघाडीचे उमेदवार आर्वी तालुक्यातील रहिवासी आहेत.
नागपूरमधील पाचपावली, गुरुदेवनगर आणि कोराडी रोड येथील उमेदवारांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील पुसला, शेवती जहागीर आणि वरूड येथील उमेदवारांचा समावेश आहे. सिंदी (मेघे), पिंपरी (मेघे), पांढरकवडा, केळकरवाडी, झाकीर हुसेन कॉलनीसह वर्धा शहरातील एकूण ८ उमेदवार आहेत. देवळी तालुक्यातील देवळीसह नाचणगाव येथील प्रत्येकी एक, समुद्रपूर तालुक्यातील लाहोरी आणि बोडखा-पाईकमारी येथील प्रत्येकी एक, तर हिंगणघाटमधील यशवंतनगर आणि चिचघाट येथील प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. यात वर्धा शहर तथा तालुक्यातील सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहे.
मतदारांपर्यंत पोहोचताना लागणार कस
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी आणि हिंगणघाट, तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव (रेल्वे) या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भौगाेलिक आकारमानाच्या दृष्टीने मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांचा कसा लागणार आहे. विशेषत: बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना अवघ्या १६ दिवसांत प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहाेचणे अवघड ठरणार आहे.
दोन महिलाही रिंगणात कायम
एकूण २४ उमेदवारांमध्ये दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यात एक महिला पाचपावली, नागपूर येथील तर दुसरी वर्धेची रहिवासी आहे. या दोघी इतर २२ पुरुष उमेदवारांसोबत लढत देणार आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.