भास्कर कलोडे - हिंगणघाटनिवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची रणधुमाळी माजविली जात आहे़यंदा विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांची काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फुटली तर शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती ऐन नामांकन भरण्याच्या दिवसांत तुटल्याने या चारही राजकीय पक्षाचे उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी बसपा व मनसेच्या उमेदवारांची उमेदवारीसुद्धा दखलपात्र आहे अन्य आठ उमेदवारांची उमेदवारीही काहींना फटका देणारी आहे. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांत युती-आघाडीच्या मोठ-मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा गाजविल्याचे साक्षीदार टाका ग्राऊंड व गोकुलधाम मैदान आहे; पण या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, बसपा व मनसे यापैकी केवळ राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रीया सुळे व आर.आर. पाटील यांनी येथे जाहीर सभा घेऊन टोलेबाजी केली. त्यांचे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दीही केली तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टाका ग्राऊंडवर चिडचिडत्या उन्हात भरदुपारी सौम्य टोलेबाजीने मतदारांचे मनोरंजन झाले. पण भाजप, शिवसेना, काँग्रेस व बसपाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची जाहीर सभा या मतदार संघात अद्याप झालेली नाही.जाहीर सभांमधून होणाऱ्या आरोप -प्रत्यारोपाची टोलेबाजी व चिमटे काढण्याचे प्रकार ऐकण्यासाठी मतदार आतूर असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारसुद्धा नेत्यांच्या जाहीर सभांची आतुरतेने वाट पाहत आहे; पण यंदा राज्यातील सर्वच मतदार प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहे. यामुळे सभा गाजविणाऱ्या नेत्यांची कमतरता निर्माण झाली़ परिणामी, काही मोजक्या मतदार संघात दिग्गजांच्या सभा होताना दिसतात़ भाजपात केंद्रीय स्टार प्रचाराकांची काही प्रमाणात उपलब्धी असली तरी राज्यात मात्र प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची उणीव जाणवत आहे; पण काँग्रेसमध्ये सभा गाजविणाऱ्या वक्त्यांची कमतरता असल्याचे काँग्रेस खासगीत बोलत आहे. शिवसेना, बसपात वक्ते असले तरी अद्याप येथे पोहोचले नाही़ यामुळे उमेदवार अस्वस्थ असून नेत्यांच्या सभांसाठी प्रयत्नशील आहे. आपल्या भाषणातून राजकारणाची दिशा व उमेदवाराची दशा बदलणारे हुकमी नेते बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलास देशमुख, गोपीनाथ मुंडे आज हयात नाही. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव यंदाच्या निवडणुकीत उमेदवार व मतदारांना प्रकर्षाने होताना दिसते़
सभांतील टोलेबाजीसाठी मतदारांसह उमेदवारही आतूर
By admin | Published: October 09, 2014 11:07 PM