लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारांसाठी ९० लाखांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, आयोगाने खर्चाचे दरपत्रकही जारी केले आहे. या दरपत्रकामुळे उमेदवारांना घाम फुटला आहे. दरपत्रकात निश्चित केलेल्या दरापेक्षा खर्चाचा आकडा कमी झाल्यास उमेदवारांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.देशातील निवडणूक दिवसेंदिवस खर्चिक होत आहे. त्यामुळे आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्यक्षात निश्चित मर्यादेच्या आतच उमेदवारांना खर्च करावा लागणार आहे. त्यातही आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसारच उमेदवारांना पावत्या जोडाव्या लागणार आहेत. मात्र, अनेक लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती मोठी असल्याने निश्चित मर्यादेच्या आत खर्च करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र चार पथके गठित करण्यात आली आहेत. ही पथके उमेदवाराने दिलेला खर्चाचा आकडा बरोबर आहे की नाही, याची खातरजमा करणार आहे.आयोगाने प्रचारासाठी भवनाच्या भाड्यापासून ते साधा हार आणि बुकेच्या खर्चाची मर्यादाही निश्चित केली आहे. भिंतीवरील खर्चाचे दरही निश्चित केले आहे. ढोलताशा आणि रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांच्या प्रमाणानुसारच खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. प्रचार मंडपात टाकल्या जाणाऱ्या खुर्च्या, सोफा, टी-टेबल, स्पीच डायस, स्टॅण्ड फॅन, कूलर, शहनाई आणि ढोल वादक, स्टेज, समई, टेबल फ्लॉवर पॉट, स्वागत बोर्ड आदींचे दरही निश्चित करण्यात आले आहे. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या भोजनाचे दरही निश्चित झाले आहे. त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचे दर वेगवेगळे ठेवण्यात आले आहे, याशिवाय चहा, नाश्ता, कॉफी, फरसाण आदींचे दरही निश्चित झाले आहे. आधुनिक युगात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. त्यावरही आयोगाची नजर राहणार आहे. मोबाईलवरून पाठविल्या जाणाऱ्या संदेशाचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. प्रतिसंदेश दहा पैसे ते साडेसात रुपयांपर्यंत दर आकारला जाणार आहे. याशिवाय विविध वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दरही आयोगाने निश्चित केले आहेत.शहर आणि ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या प्रचार फलकांचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. या फलकांसाठी प्रति चौरस फुटानुसार दर लावले जाणार आहेत.५० रुपयांचा फेटा अन् २० रुपयांची गादीप्रचार कार्यालयात अथवा प्रचारासाठी वापरल्या जाणाºया गादी आणि चादरीसह कार्यकर्त्यांना बांधल्या जाणाºया फेट्यांचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फेटा दिसल्यास ५० रुपये खर्च लावला जाणार आहे. याशिवाय प्रचार मंडपातील गादीसाठी २० रुपये तर रंगीत चादरीसाठी १० रुपयांचे दर निश्चित केले आहे. पांढऱ्या चादरीचे दर १५ रुपये असून लोड आणि खोळीसाठी दहा रुपय दर निश्चित केला आहे. एका सतरंजीसाठी ५० रुपयांचा दर आहे. गालिचासाठी १०० रुपये तर विविध आकारमानाच्या शामियानासाठी ४०० रुपये ते हजार रुपयांचे दर निश्चित करण्यात आले आहे. फायबर खुर्ची आणि व्हीआयपी खुर्च्यांचे दरही ठरविण्यात आले आहेत. याशिवाय विविध वाहनांचे दरही निश्चित झाले आहे.
निवडणूक खर्चाच्या दरपत्रकाने उमेदवारांना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:37 PM
निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारांसाठी ९० लाखांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, आयोगाने खर्चाचे दरपत्रकही जारी केले आहे. या दरपत्रकामुळे उमेदवारांना घाम फुटला आहे.
ठळक मुद्देखर्चाची मर्यादा ९० लाख : आयोगाची असणार नजर