लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ५० ग्रा.पं.मधील ४७२ जागांसाठी एकूण १ हजार ४४८ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयात इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. वर्धा तालुक्यातील तीन, सेलू तालुक्यातील तीन देवळी तालुक्यातील तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील सात, कारंजा तालुक्यातील आठ, हिंगणघाट तालुक्यातील पाच तर समुद्रपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या ५० ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात एकूण १७३ प्रभाग असून मतदारांना ४७२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. १५ जानेवरीला प्रत्यक्ष मतदान होणार असून १ लाख १८ हजार ६३३ मतदार या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सुरूवातीला इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच नामनिर्देशन अर्ज दाखल करणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. पण नंतर ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे मुभा देण्यात आली. मंगळवारपर्यंत एकूण ६७७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७७१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ५० ग्रा.पं.तील ४७२ जागांसाठी १ हजार ४४८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी छानणीदरम्यान किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात तसेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
१५ जानेवारीला १.१८ लाख मतदार बजावणार हक्कवर्धा तालुक्यातील ३४ मतदार केंद्रांवरून २१२२३, सेलू तालुक्यातील २३ केंद्रांवरून ११९२६, देवळीतील ९ केंद्रांवरून ५२४७, आर्वी तालुक्यातील २७ केंद्रांवरून १४४६६, आष्टी तालुक्यातील २२ केंद्रांवरून १३४४१, कारंजा तालुक्यातील २७ केंद्रांवरून ११७०६, हिंगणघाट तालुक्यातील १६ केंद्रांवरून ९४६९ तर समुद्रपूर तालुक्यातील ५९ केंद्रांवरून ३११५५ मतदार १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.