अरविंद काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात सहा लोकांचे जीव घेणारी नरभक्षी वाघीण न्यू बोर अभयारण्यात ठेवण्यात आली आहे. ते अंतर माळेगाव (ठेका) गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर आहे. परिणामी, नरभक्षक वाघिणीची ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे शेतशिवार सायंकाळी ५ वाजताच निर्मनुष्य होतो. रात्रीची जागलीही बंद झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.सुरक्षिततेचा उपाय म्हणून आमगाव-मरकसूर हा मार्ग रहदारीसाठी बंद केला आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून २४ तास वनविभाग व पोलीस गस्त घालत आहेत. माळेगाव (ठेका) या गावाला चारही बाजूला सागाचे जंगल आहे. सर्वच शेती जंगलाला लागून आहे. यामुळे शेतात बियाणे पेरले की शेतमाल घरी येईपर्यंत जागली करावी लागते. याशिवाय हाता-तोंडाचा मेळ बसत नाही; पण नरभक्षक वाघिण गावानजीक सोडल्यामुळे शेतकºयांची झोपच उडाली आहे. सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी शेतकरी, शेतमजूर, जनावरे घराचा रस्ता पकडतात. रात्रीची जागली बंद झाल्याने श्वापदांना रानच मोकळे झाले आहे. असंख्य शेतकºयांच्या शेतातील शेतपिके श्वापदांनी खाण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणाची माहिती घेण्याकरिता या परिसराचा फेरफटका मारला असता प्रत्येकाचा चेहरा चिंताग्रस्त दिसून आला. काळजीने काळवंडलेले चेहरे बरेच काही सांगून जात होते. आधीच येथे नापीकी पाचवीला पुजलेली. त्यात हा तेरावा महिना. यामुळे त्यांची झोप उडाल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले. सदर नरभक्षक वाघिणीला खाद्य म्हणून ४ हले व एक बोकड सोडल्याची माहिती वनसुत्राने दिली. एक हला नरभक्षक वाघिणीने फस्त केला आहे तर एक झाडामध्ये पडून आहे, असेही ते म्हणाले. यावरून वाघिणीला जनावरांचे मांस आवडत नसावे. जंगलात मोकळे सोडल्यानंतर मानवी रक्ताची चटक लागल्याने ती गावाकडे नरभक्षणासाठी कुच करणार नाही, असे म्हणता येत नाही. यामुळे ग्रामस्थ धास्तावल्याचे दिसून येत होते.आमगाव ते मरकसूर मार्ग केला बंदनरभक्षक वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याकरिता हत्ती आणण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा भाग म्हणून आमगाव ते मरकसूर हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. आमगाव आणि मरकसूर या दोन्ही गावांमध्येदेखील भीतीचे वातावरण असल्याचे प्रत्यक्ष भेटीत दिसून येत होते. नागरिकांच्या मनात काळजीने घर केले असून नरभक्षक वाघिण गावांकडे तर कुच करणार नाही ना, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात होती.आमगाव ते मरकसूर रस्ता रहदारीसाठी बंद केला असला तरी मानवी रक्ताची चटक लागलेली वाघिण गावशिवारात भटकण्याची शक्यताच वर्तविली जात होती. यामुळे ग्रामस्थांच्या चेहºयावर दहशतीचे भाव स्पष्ट दिसत होते.लोकमत आॅन दि स्पॉटआमच्या गावासाठी दुष्काळ नवीन नाही; पण आम्ही गोधनावर सुखी आणि समाधानी जीवन जगत होतो. शेतात सात महिन्यांपर्यंत जागल करून कशीबशी पिके घेली आणत होतो; पण आता गावालगत जंगलात ही वाघिण सोडल्याने सारेच संपले.- प्रभाकर घाटोळ, सरपंच, ग्रामपंचायत, माळेगाव (ठेका).वाघोबांचे दर्शन माळेगाव (ठेका) गावातील लोकांसाठी नवीन नाही. आमच्या शेतातील माळेसुद्धा वाघांच्या उडीच्या उंचीपेक्षा उंच असते. असे असताना जोखीम पत्करुन आम्ही जागल करीत होतो; पण आता ४ वाजले की, अंगावर काटा उभा राहतो. ५ नंतर प्रत्येक घरातून तो अजून आला नाही का, याची विचारणा होते.- आशिष काकडे, शेतकरी, माळेगाव (ठेका).
‘त्या’ नरभक्षक वाघिणीची दशहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:13 AM
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात सहा लोकांचे जीव घेणारी नरभक्षी वाघीण न्यू बोर अभयारण्यात ठेवण्यात आली आहे.
ठळक मुद्देमाळेगाव (ठेका) शिवार ५ वाजताच होते निर्जन : जागली अभावी शेत पिकांचे नुकसान