वाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे वाहन बजाज चौक परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकावर चढले. या वाहनाचा चालक आणि त्यात असलेले अन्य दोघे दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावरून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेत त्याला वैद्यकीय तपासणीकरिता नेले. चालक नशेत होता अथवा नाही याचा खुलासा वैद्यकीय अहवालानंतर होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलीस सुत्रानुसार, बजाज चौक परिसरात एम एच ३२ जे ०२३३ क्रमांकाची कार रस्ता दुभाजकार चढल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळ दाखल केले असता सदर कार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची असल्याचे समोर आले. चालकाला विचारणा केली असता त्याच्याकडून नुकतेच समाजकल्याण सभापतींना गावाला सोडून परत आलो असून नियंत्रण सुटल्याने वाहन रस्ता दुभाजकावर चढल्याचे सांगण्यात आले. या वाहनाचा चालक अरुण निंबेकर हा नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावरून वाहन चालकावर शहर पोलीस ठाण्यात वाहन कायद्याच्या १८५, १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर चालक नशेत आहे अथवा नाही याची तपासणी करण्याकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. चालकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी गाडीत असलेले दोघे घटनास्थळाहून पसार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघेही या विभागाचेच पदाधिकारी असल्याची चर्चा जोरात आहे. वाहन चालकाने या दोघांसदर्भात अद्याप कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही, असे असताना पोलिसांकडूनही त्यांचा शोध घेण्यात येत नसल्याची माहिती आहे. चालकाला वाचविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सदर चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता एका वाहतूक पोलिसांकडून येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रकरणाचा अहवाल साधारण बनविण्याची भाषा बोलली जात होती. यावरून कार्यरत अधिकाऱ्यांनी पोलिसांना तुम्हीच अहवाल बनवा, येथे कशाला आणले म्हणून चांगलेच फटकारल्याची माहिती आहे.
रस्ता दुभाजकावर चढली कार
By admin | Published: June 25, 2017 12:37 AM