वर्धा : विजेचा जास्त वापर होऊनही विद्युत देयक कमी यावे यासाठी अनेक व्यक्ती विद्युत मीटरमध्ये छेडछाड करतात, पण वीज वापर शून्य ते ४० युनिट असलेल्या ग्राहकांवर सध्या महावितरणचा विशेष वॉच असून, भरारी पथकांकडून अचानक छापा टाकून मीटर तपासणी केली जात आहे. विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळताच या भरारी पथकातील अधिकाऱ्यांकडून दोषीवर दंडात्मकसह फौजदारी कारवाई केली जात आहे.
विद्युत चोरीच्या प्रकारामुळे महावितरणला मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महावितरण कंपनीकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी गोपनीय माहितीच्या आधारे विद्युत ग्राहकाच्या निवास्थानी, व्यावसायिक प्रतिष्ठान आदी ठिकाणी छापा टाकून सदर ठिकाणी विद्युत चोरी तर होत नाही ना याची शहानिशा करतात. विद्युत चोरी हा कायद्यान्वये गुन्हा आहे, हे विशेष.
दिवाळीआधीच ३,८२४ घरांत अंधार
विद्युत देयकांच्या थकबाकीचा आकडा ३१२.६२ कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे महावितरणकडून थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ८२४ ग्राहकांची विद्युतजोडणी खंडित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात विद्युतचोरीचे प्रमाण नाममात्रच
विद्युतचोरी करणाऱ्यांवर महावितरणच्या भरारी पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाते. शिवाय विद्युत चोरी हा कायद्यान्वये गुन्हा असून, विद्युत चोरी करणाऱ्याला दंडात्मक व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते याबाबतची महावितरणकडून वेळोवेळी जनजागृती केली जात असल्याने जिल्ह्यात विद्युतचोरीचे प्रमाण नाममात्रच असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे वीजपुरवठ्याची निव्वळ थकबाकी ३१२.६२ कोटी रुपये आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात असून थकबाकीची रक्कम अदा न करणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. नागरिकांनीही आपल्याकडील विद्युत देयकाची थकबाकी वेळीच अदा करून महावितरणला सहकार्य करावे.
- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा
ग्राफ
जिल्ह्यातील वीजग्राहक
घरगुती : २,९८,४०५
वाणिज्य :१९,०३७
औद्योगिक : ४,३०३
कृषिपंप : ७५,४४७