मृतदेहाजवळ आढळली चिठ्ठी : अस्पष्ट अक्षरामुळे मजकुराबाबत संभ्रमपवनार : वर्धा-पवनार मार्गावरील मामा-भांज्याच्या कबरीलगत राजेंद्र बांगडे यांच्या मालकीच्या शेतात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव ज्ञानेश्वर बाबाराव नागपूरे (५५) असे असून तो वर्धा बाजार समितीत भारवाहक म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. मृतदेहाजवळ विषाची बाटली व एक चिठ्ठी मिळून आल्याने ज्ञानेश्वर याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेहाजवळून किटकनाशकाची बाटली, पाण्याची बॉटल, गावठी दारू असलेली बॉटल, एक मोबाईल, काळ्या रंगाची बॅग असे साहित्य जप्त केले. मृतकाचा पंचनामा करताना त्याच्याजवळ एक चिठ्ठी लिहून असल्याचे दिसून आले. या चिठ्ठतील अक्षर अस्पष्ट असल्याने त्यातील मजकुराबाबत संभ्रम आहे. मृतक हा वर्धा बाजार समितीत भारवाहकाचे काम करीत असून तो मुळचा आंजी (मोठी) येथील रहिवाशी आहे. सध्या तो म्हसाळा येथे वास्तव्यास असल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. पोलीस सुत्रानुसार, दिवाकर कसार हे शेतात काम करीत असताना त्यांना तुरीच्या ओळीत मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती शेत मक्त्याने घेणारे विनायक वाघमारे यांना दिली. त्यांनी प्रकाराची कल्पना तात्काळ सेवाग्राम पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक अचल मलकापूरे यांनी घटनास्थळ गाठत कर्मचाऱ्याच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सेवाग्राम रुग्णालयात रवाना केला. घटनेची नोंद पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे. मृतकाची एमएच ३२ टी ५७५० क्रमांकाची दुचाकी शनिवारपासून मामा-भांजा कबरी शेजारी उभी असल्याचे तेथील पुजाऱ्याने सांगितले.(वार्ताहर) मृत्यूचे रहस्य चिठ्ठीतज्ञानेश्वर याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळली आहे. या चिठ्ठीत असलेले अक्षर अस्पष्ट असल्याने यात नेमके काय लिहिले हे सध्या कळू शकले नाही. चिठ्ठी पाहिली असता प्रथमदर्शी यात १० लाख रुपयांचे कर्ज व त्याच्या कोण्या नातलगाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट दिसते, शिवाय या चिठ्ठी एक नाव असून ते अस्पष्ट असल्याची माहिती तपासी अधिकारी जमादार संतोष पांडे यांनी दिली. या चिठ्ठीवर कोणाची स्वाक्षरी नसल्याने ही चिठ्ठी मृतकाने स्वत: लिहिली अथवा नाही याबाबतही संभ्रम असल्याचेही ते म्हणाले. यामुळे ज्ञानेश्वरच्या मृत्यूचे कारण या चिठ्ठीत दडले असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात होती.
वर्धा बाजार समितीच्या भारवाहकाची आत्महत्या
By admin | Published: November 07, 2016 12:39 AM