वर्धा : हुंडा घेणं हा गुन्हा असला तरी अद्यापही देशातील अनेक भागात तो घेतला जातो. गाडी, फ्लॅट, दागिने, पैसे अशा स्वरुपात भेटवस्तूंच्या नावाखाली मागणी केली जाते. हुंड्यापायी अनेक लग्न मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासातून सुनेचा प्रचंड छळ देखील केला आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली.
लग्नमंडपात आयत्या वेळी हुंड्यासाठी नवरदेव अडून बसला. १० लाखांची मागणी केली. मागणी पूर्ण न होताच वरात घेऊन येण्यास नकार दिला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात नवरदेवासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांनी दिली.
हिंगणघाट येथील तरुणीचे वरोरा येथील पुंडलिक वामन बावने याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न जुळले, घरात लग्नाची तयारी सुरू झाली. साखरपुड्याचाही कार्यक्रम आटोपला. २० ऑगस्टला वरोरा येथे लग्नाचा मुहूर्त ठरला. नववधूसह कुटुंब वरोरा येथे लग्नाला गेले; मात्र नवरदेवाने मुलाच्या उपचारासाठी १० लाखांची मागणी वधूपित्याकडे केली; पण वधूपित्याने ती मागणी पूर्ण न केल्याने नवरदेवाने वरातच थांबवून लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुंडलिक बावने, श्रीकृष्ण किसन बावने, मीराबाई श्रीकृष्ण बावने यांच्याविरुद्ध कलम ३,४ हुंडाबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वधू पक्षाकडील मंडळीला मोठा धक्का
लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती.लग्नपत्रिकाही छापून सर्वांकडे गेल्या होत्या. आचारी, डेकोरेशन, हॉल, मेहंदीवाले, सगळे बुक झाले होते; मात्र वेळेवर नवरदेव लग्नमंडपात न आल्याने वधू पक्षाकडील मंडळींना याचा मोठा धक्का बसला इतकेच नव्हे तर नववधू व तिच्या कुटुंबीयाची बदनामी झाली. आर्थिक नुकसानही त्यांना सोसावे लागले.
लग्नाच्या एक दिवसापूर्वी नवरदेवाचा फोन
ठरल्याप्रमाणे सासरच्या सर्व मागण्या नववधूच्या घरच्यांनी पूर्ण केल्या; मात्र लग्नाच्या एक दिवसापूर्वी नववधूच्या वडिलांच्या मोबाईलवर पुंडलिकने फोन करून उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर लग्न होणार नाही, असे सांगण्यात आले. वधू मंडळी नवरदेवाच्या घरी जात त्यांची समजूत काढली; मात्र १० लाख दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात वधूमंडळी वाट पाहत राहिली पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही.
आरोपीला आणण्यासाठी पथक जाणार
नववधूच्या वडिलांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार हुंडाबंदी कायद्यांतर्गत नवरदेवास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील पथक लवकरच वरोरा येथे रवाना होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांनी दिली.