लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर महावितरणने थकबाकी वसुलीला गती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात महावितरणने तब्बल ३ लाख ९८ हजार ७७४ ठिकाणी विद्युत जोडणी दिली असून या ग्राहकांकडे तब्बल ३२१.६१ कोटींची रक्कम थकली आहे. थकबाकीदारांनी वेळीच देयक अदा करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अजूनही अनेकांनी विद्युत देयक न भरल्याने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आहे.
महावितरणचे ग्राहक काय म्हणतात
कृषिपंपांना पूर्णक्षमतेने केवळ आठ तास विद्युत पुरवठा दिला जातो. मागील दोन वर्षांपासून नापिकी पदरी येत असल्याने कृषिपंपाचे विद्युत देयक थकले. पण पीक निघाल्यावर थोडे-थोडे करून विद्युत देयक अदा करूच. महावितरणच्या अधिकाऱ्यांची अडचण शेतकरी समजतो, पण शेतकऱ्यांचीही अडचण महावितरणने थोडी समजून घेतली पाहिजे.- सुरेंद्र उईके, शेतकरी
कोविड संकटकाळात अनेकांचे रोजगार हिरावले. त्यामुळे पोट कसे भरावे हाच पहिला प्रश्न अनेकांच्या डोळ्यासमोर होता. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कसाबसा रोजगार मिळायला लागला आहे. थोडे-थोडे करून विद्युत देयक अदा केले जात आहेत. महावितरणनेही थोडे दमाने घेतले पाहिजे.- महादेव चौधरी, नागरिक.
विद्युत देयकापोटी नागरिकांकडे मोठी थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्य तसेच कृषीपंपधारकही आहेत. मोठ्या थकबाकीमुळे आमच्याही अडचणीत भर पडली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी भरून महावितरणला सहकार्य करावे. आणि आपली दिवाळी प्रकाशमान करावी.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा