लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : हंगामातील खासगी व केंद्र शासनामार्फत आधारभूत किमतीने कापूस खरेदीचा प्रारंभ संचालक डॉ. निर्मेश कोठारी यांच्या हस्ते सोमवारी कापूस मार्केट यार्ड येथे करण्यात आला. कापूस खरेदी प्रारंभ प्रसंगी प्रथम कापूस वाहनाचे संचालक डॉ. निर्मेश कोठारी यांनी शेतकरी मारोती रामाजी धस (रा. वाघोली) यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सिसिआयचे ग्रेडर शसुमित देशमुख, समितीचे संचालक उत्तम भोयर, प्रफुल बाडे, ओमप्रकाश डालीया, राजेश मंगेकर, घनश्याम येरलेकर, संजय कातरे, आदी शेतकरी बांधव व अडते उपस्थित होते. प्रारंभ प्रसंगी कापूस मार्केट आवारात ३७५ वाहनाद्वारे कापसाची आवक झाली. आधारभूत किमतीने सिसिआयने ७ हजार ५२१ ते ७ हजार २२० प्रमाणे कापसाला दर देण्यात आले, तर खासगी कापूस खरेदीदाराद्वारे मालाच्या प्रतिनुसार साधारणतः ७ हजार ३५५ ते ७ हजार १९० कापसाला दर देण्यात आले.
खासगी कापूस खरेदीदारामध्ये प्रकाश व्हाईट गोल्ड, जलाराम इंडस्टीज, माँ भवानी, सालासर झॉटेक्स, बालाजी जिनिंग, श्रीनिवास जिनिंग, एस. एस. इंडस्टीज, रुख्मनी कॉटेक्स, पदमावती अॅग्रो, विजयलक्ष्मी जिनिंग, धनराज कॉटेक्स, साईकृपा जिनिंग, मॉ रेणुका जिनिंग व जि. व्हि. आर फायबर हे कापूस खरेदीदार उपस्थित होते.
यावेळी सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी आधारभूत किंमत व खुल्या दरामध्ये फरक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सि.सि.आय.ला कापूस विकावा, तसेच सिसिआयला कापूस विक्रीकरिता आणत असताना नमुना ८ अ, कापूस या पिकाच्या क्षेत्राची नोंद असलेला चालू वर्षाचा डिजिटल ७/१२, आधारकार्ड इत्यादी दस्तावेज सोबत आणावे, असे आव्हान समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.