रोहणा : स्व. धैर्यशिल व वाघ स्मृती जनता कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेत ६ नोव्हेंबरपासून भारतीय कापूस निगमची खरेदी सुरू आहे़ अत्यल्प कापसाची आवक असल्याने हे शासकीय कापूस खरेदी केंद्रही बंद होणार, असे संकेत आहेत़ ही बाब अन्यायकारक आहे़ शेतकरी दरवाढ होईल म्हणून प्रतीक्षेत असल्याने कापूस विकत नसल्याची वस्तूस्थिती आहे. भविष्यात कापसाची आवक वाढणार असल्याने सीसीआयने खरेदी बंद करू नये, अशी मागणी होत आहे़रोहणा केंद्रावर सीसीआय या केंद्र शासनाच्या अधिपत्यातील यंत्रणेची व आर्वी येथील साईनाथ ट्रेडींग कंपनीची खासगी कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयचा भाव ४ हजार ५० रुपये असून खासगी व्यापारी ५० रुपये अधिक म्हणजे ४ हजार १०० रुपये देत कापूस खरेदी करतात. सीसीआयचा चुकारा बॅँकेद्वारे ८ ते १० दिवसांत मिळतो. खासगी व्यापारी रोख चुकारा असेल तर ५० रुपये प्रती क्विंटल बटावा कापून रक्कम देतो. यात शेतकरी त्वरित ५० रुपये अधिक मिळतात व बॅँकेच्या चकरा वाचतात म्हणून खासगी व्यापाऱ्यांना विकण्यास अधिक पसंती देतो. यामुळे रोहणा केंद्रावर खासगी व्यापाऱ्याला अधिक कापूस मिळतो़ या निराशेतून सीसीआय खरेदीतून अंग काढणार असल्याचे दिसते़ या केंद्रावरील खरेदी बंद करणार असल्याचे सांगण्यता येते़ आवक कमी आहे, हे खरे असले तरी शेतकऱ्यांकडील कापूस संपलेला नाही़ राज्य शासन अग्रीम बोनस देईल वा केंद्र शासन हमीभावात वाढ करेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उर्वरित कापूस ठेवला आहे़ भाववाढीचे पर्याय संपल्यानंतर शेतकरी कापूस विकतील़ सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्यास खासगी व्यापारी भाव पाडून शेतकऱ्यांची लूट करतील़ यामुळे शासकीय खरेदी सुरू राहणे गरजेचे आहे़(वार्ताहर)
सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र होणार बंद!
By admin | Published: December 29, 2014 1:57 AM