वर्धा : महादेवपुरा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वधू-वराची वाट पाहत होती. वरात मंदिराजवळ पोहचली होती. वर वधूमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच अचानक गादी कारखान्यातून आगीचे लोळ उठताना पाहताच वराने वरात सोडून सुमारे ५०० मीटर अंतरावर जाऊन विश्रांती घेतली. अवघ्या काही वेळातच वधू मंडळीनेही लग्नमंडपातून काढता पाय घेत बाहेर पडले.
आगीच्या घटनेने लग्नस्थळी आलेल्या वऱ्हाड्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. महादेवपुरा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. किन्ही मोई येथील वर आणि वर्ध्यातील वधूचा विवाह सोहळा दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी नियोजित होता. लग्नमंडपात सर्वच जण आनंदी होते. स्वयंपाकालाही सुरुवात झाली होती. वराने नजीकच्या हनुमानाच्या मंदिरात पूजा करून वरात वाजत-गाजत वरात काढून लग्नमंडपाकडे जात असतानाच शेजारी असलेल्या गादी कारखान्याला आग लागली अन् आगीचे लोळ उठू लागले. हे दृश्य पाहून वरपक्षाकडील मंडळी वराला घेऊन काही दूर अंतरावर नेऊन दुकानातील आग नियंत्रणात येईपर्यंत बाहेरच थांबली होती. यामुळे लग्नालाही विलंब झाला.
स्वयंपाक बंद, सिलिंडर काढले बाहेर
शेजारी लागलेल्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच लग्नमंडपात सुरू असलेल्या स्वयंपाकींनी सिलिंडर बंद करून लग्नमंडपाबाहेर काढले. आग हळूहळू मंडपाच्या दिशेने पसरू लागल्याचे पाहताच लग्नमंडपात धावपळ झाली.
अन् गर्दीने गजबजला महादेव मंदिर परिसर
गादी कारखान्याला आग लागल्यानंतर शेजारी सुरू असलेल्या लग्न सोहळ्यातील वर आणि वधू मंडळींकडून वऱ्हाडी लग्न मंडपाबाहेर धावत सुटले. काही वेळातच या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. एकीकडे नवरदेव मुंडावळ्या बांधून एका दुकानाबाहेर उभा होता तर वधू लगतच्याच दुकानात आग विझवण्याची वाट पाहत होती.
वऱ्हाड्यांनी केला आग विझविण्याचा प्रयत्न
लग्नसोहळ्याच्या शेजारील दुकानाच्या आतमध्ये काहीतरी जळताना दिसताच लग्नसोहळ्याला उपस्थित तरुणांनी पाईपच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारखान्यात कापूस आणि गाद्या असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला.