जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार वर्धा : जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी सभा पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सेलूत तंबाखुमुक्त शाळांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त जि. प. शाळांचा तालुका म्हणून सेलूची घोषणा केली. सेलू तालुक्यात राबविलेल्या अभियानाची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सुशील बनसोड यांनी उपस्थितांना दिली. अभियानांतर्गत तंबाखु व्यसनापासून मुक्त झालेल्या तालुक्यातील आठ शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात वर्धाश्री असे प्रमाणपत्र देत सन्मान केला. तसेच पालकांचे व्यसन सोडविणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रेहकीच्या दोन विद्यार्थ्यांचा गुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. अभियानात विशेष कार्य केल्यागद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उमेश राठोड यांचाही सत्कार करण्यात आला. या अभियानात विशेष सहकार्य करणारे लायन्स क्लबचे नौशाद बक्ष, ऋतुराज चुडीवाले यांनाही सन्मानचिन्ह देण्यात आले. नयना गुंडे यांनी वर्धा जिल्हा जगातील दुसरा तंबाखूमुक्त जि. प. शाळांचा जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सर्व जि. प. शाळांनी तंबाखुमुक्तीचे संपूर्ण ११ निकष पूर्ण करून आपली शाळा तंबाखुमुक्त जाहीर करावी, असे सांगितले. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना तंबाखुमुक्तीची शपथ दिली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विवेक इलमे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले, सलाम मुंबईचे फाउंउेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अजय पिळणकर, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी) तंबाखु सोडणाऱ्या आठ शिक्षकांना ‘वर्धाश्री’चे प्रमाणपत्र जिल्ह्यात राबविण्या येत असलेल्या तंबाखुमक्त शाळा अभियानात उत्तम कार्य सुरू असल्याचे दिसून आले आहे. सेलू तालुका तंबाखुमुक्त शाळांचा पहिला तालुका ठरला. या अभियानादरम्यान तंबाखु सोडणाऱ्या आठ शिक्षकांना वर्धाश्री असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याच वेळी आपल्या पालकांचे तंबखाचे व्यसन सोडविण्यात यशस्वी ठरलेल्या रेहकी शाळेतील दोन विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सेलूला तंबाखुमुक्त तालुक्याचा मान
By admin | Published: April 11, 2017 1:14 AM