वर्धा : सध्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सुरू आहे. काही दिवसात माध्यमिक शाळांची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रांवर आलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्याची जबाबदारी केंद्र असलेल्या शाळेची असताना जिल्ह्यातील बऱ्याच केंद्रात मुलभूत सुविधा नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले. याची दखल घेत भरारी पथकाने भेटी दरम्यान केंद्राची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना सुुविधा नसल्याचे वास्तव जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचले. केवळ जिल्हाच नाही तर नागपूर येथील उपसंचालकांपर्यंतही हा प्रकार पोहोचला. यावरून भरारी पथकाने परीक्षा केंद्रावर गेल्यावर केवळ कॉपी सुरू असल्याचीच नाही तर केंद्रात असलेल्या सुविधांचीही माहिती त्यांच्या अहवालात सादर करावी आहे. हा अहवाल तयार करताना तो खरा असावा अशी ताकीदही देण्यात आल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात परीक्षा केंद्र देताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागाची आहे. ज्या केंद्रात सुविधा नाही अशा शाळांत परीक्षा केंद्र देवू नये असे आदेश आहे. असे असताना जिल्ह्यातील बऱ्याच शाळांत आवश्यक सुविधा नसल्याचे दिसून आले. कुठे जनरेटर नाही तर कुठे विद्यार्थ्यांकरिता पंखे नाहीत. कुठे खिडक्यांना पल्ले नाही. काही केंद्रात शौचालयाची सोय नाही, कुठे पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी अस्वच्छतेचा कळस असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. यातून शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. अशात शिक्षण उपसंचालकांकडून आलेल्या या सूचनांमुळे शिक्षण विभागाचा गोंधळ उडाल्याची माहिती आहे. अहवाला त्रुट्या आढळल्यास केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
भरारी पथकाला केंद्र तपासणीच्या सूचना
By admin | Published: February 27, 2015 12:04 AM