महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातीलच चक्क सात ग्रा.पं.ची केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या वेबसाईटवर गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेने ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही केंद्र सरकारच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातून सात गावांना वंचित राहावे लागले आहे.वैराग्यमुर्ती गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर पुरुषांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून त्यासाठी कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी लोकचळवळच उभी केली. त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधींची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेबसाईटवर स्थानच देण्यात आले नाही. जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती आहेत. मात्र, केंद्राने केवळ ५१३ ग्रामपंचायतीच यात दाखविल्या आहेत. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ राज्य सरकारच्या ग्रामीण विकास व केंद्र सरकारकडे लेखी पत्र पाठविले. शिवाय हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु, जिल्हा परिषदेच्या पत्राला केराची टोपली केंद्र व राज्य सरकारने दाखविली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणतून या ग्रामपंचायती बाद ठरल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व ग्रामपंचायची प्रकल्पामुळे पुर्नवसन झालेल्या गावांच्या आहेत.
स्थान न मिळालेली गावेआर्वी तालुक्यातील मिर्झापूर ग्रा.पं.चे विभाजन करून नेरी पुनर्वसन, बोथलीचे विभाजन करून नटाळा, पिपरीचे विभाजन करून पिपरी पुनर्वसन, वाठोडाचे विभाजन करून हैबतपूर, मांडलाचे विभाजन करून जाम, अहिरवाडाचे विभाजन करून सर्कसपूर तर उसेगाव ग्रा.पं.ची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, सदर ग्रा.पं.ची नोंदच स्वच्छसाठी घेण्यात आलेली नाही.
केंद्राची भूमिका बघ्याचीवर्धा जिल्ह्यातील सदर सात गावांची नावे वगळली आहे अशी माहिती आर्वी तालुक्यातील सर्कसपूरचे उपसरपंच निखील कडू यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे केली. मात्र, ना. उमा भारती व त्याच्या मंत्रालयाने उपसरपंच कडू यांच्या तक्रारीची दखल ही घेतली नाही. पूर्वी वर्धा जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रा.पं. होत्या. त्यानंतर समुद्रपूर, आष्टी, कारंजा, सेलू ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ही संख्या घटून ५१३ वर आली; पण दरम्यानच्या काळात सात ग्रा.पं. नव्याने तयार करण्यात आल्याने ही सख्या ५२० इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी होणे ही बाब प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी गौरवाचीच आहे. आम्ही संबंधितांना निवेदन देऊन पाठपुरावा केला; पण प्रभावी कार्यवाही झाली नाही. सर्कसपूरसह जिल्ह्यातील सदर सातही ग्रा.पं.ना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी करून घ्यावे. शिवाय त्यांची नोंद स्वच्छच्या वेबसाईटवर करावी.- निखील कडू, उपसरपंच, ग्रा.पं. सर्कसपूर.