केंद्राचे कायदे साठेबाज, नफेखोरांच्या हिताचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 03:54 PM2020-10-31T15:54:36+5:302020-10-31T15:55:39+5:30
Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात : सेवाग्राम येथे काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह
सेवाग्राम (वर्धा) - केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे केलेले आहेत. या कायद्याविरुद्ध आम्ही सत्याग्रह करीत आहोत. महात्मा गांधींनी न्याय मागण्यांसाठी सत्याचा मार्ग दाखविला. त्याच मार्गाने आमची वाटचाल सुरू आहे. केंद्राने केलेले कायदे हे साठेबाज आणि नफेखोराच्या बाजूचे आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
सेवाग्राम आश्रमात शनिवारी सकाळी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल, भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेसने या सत्याग्रहाचे आयोजन येथे केले होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी आश्रम परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी लावलेल्या वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आश्रमासमोर सत्याग्रह आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आशीष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विजय औताळे, काँग्रेसचे समन्वयक मुजफ्फर हुसैन, प्रदेश प्रतिनिधी रवींद्र दरेकर, जिया पटेल, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, शेखर शेंडे, माजी मंत्री अनिस अहेमद, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल राऊत, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदी उपस्थित होते.
आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी काँग्रेस नेत्यांचे आश्रमात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नव्या कृषी कायद्यामुळे शेतकºयांच्या शोषणाचे काम होणार असून कै. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेली बाजार समितीची व्यवस्थाही हद्दपार केली जाणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी विकलेल्या शेतमालाच्या पैशाची हमी कोण घेणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाहेरचे व्यापारी येऊन शेतमाल खरेदी करतील, साठेबाजी करतील. जनतेला महागड्या वस्तू विकत घ्याव्या लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ह्यवैष्णव जन तोह्ण भजन व वैदिक प्रार्थना तसेच सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व हर देश मेंह्ण तू या भजनाने प्रार्थनेची सांगता झाली. त्यानंतर सत्याग्रहस्थळी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्याग्रहाच्या शामियानात केवळ ४० लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. सत्याग्रह सुरू असलेल्या ठिकाणी केवळ तीन महिलांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. ह्यरघुपती राघव राजा रामह्ण हे भजन आणि राष्ट्रवंदनेने काँग्रेसच्या या सत्याग्रहाची सांगता झाली.
महाविकास आघाडी सरकार या कायद्याचा विरोध करणार
केंद्र सरकारने लागू केलेल्या या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विरोध करणार असून लवकरच मंत्रिमंडळाची उपसमिती यासाठी बैठक घेणार आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाका
मराठा समाजाचे १२ टक्के आरक्षण सोडून इतर जागा भरून टाकाव्यात कारण इतर समाजात असंतोष वाढणार नाही आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळेल. ओबीसींचे आरक्षण आहे. परंतू लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून दिले पाहिजे. ओबीसींमध्ये असंतोष आहे. आम्ही किती दिवस थांबायच हा प्रश्न ते करताआहेत अशी भूमिका राज्याच्या मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्याग्रह स्थळी माध्यमांशी बोलतांना मांडली. केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यासाठी राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. या कायद्यामुळे देशातील शेतकरी उद्धस्त होणार आहे. असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.