वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची ग्रंथ दालने राहणार असून शुक्रवारी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडली.
अनेक वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. शिवाय संमेलन उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
संमेलनाला किमान एक लाख साहित्य रसिकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. बैठकीदरम्यान साहित्य संमेलनस्थळी आवश्यक सुविधा, पुस्तकाचे स्टॉल, ग्रंथ दिंडी मार्ग, बाहेरुन येणारे साहित्यिक, पाहुणे, मान्यवर व साहित्य रसिकांची निवास व्यवस्था, भोजन, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली.
विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहायक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दाते, सरचिटणिस विलास मानेकर, महेश मोकलकर, अनिल गडेकर आदींची उपस्थिती होती.