रुग्णांची हेटाळणी : प्रकल्प संचालकाकडे तक्रार; कारवाईची मागणीवर्धा : आर्वी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत पी.पी.टी.सी.टी. समुपदेशक यांच्याकडून तपासणीकरिता जाणाऱ्या रुग्णांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. एड्स रुग्णांबाबत असंवेदनशिलता बाळगत असल्याच्या अनेक तक्रारी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. मात्र सदर कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीच कार्यवाही होत नसल्याने त्याचे मनोबल वाढले आहे. त्रस्त झालेल्या रुग्ण आणि लिंक वर्कर यांनी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था प्रकल्प संचालक यांच्याकड तक्रार दिली.बरेचदा तपासणीकरिता जाणाऱ्या रुग्णांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिवाय रुग्णांना तपासणीला नेणाऱ्या वर्करलासुद्धा समुपदेशकाच्या मनमानीचा सामना करावा लागतो. यामुळे रुग्णांची कुचंबना होत आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आली आहे. यावर तातडीने कारवाई करुन या समुपदेशकाची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा समुपदेशकाला रुग्णांसोबत योग्य व्यवहार करण्याची समज दिली जावी अशी मागणी करण्यात आली.निवेदनानुसार, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत समुपदेशक राहुल शेंडे हे तपासणी करिता जाणाऱ्या एचआयव्ही पॉझिटीव्ह व संशयीत रुग्णांना आणि लिंक वर्करला अपमानास्पद वागणूक देतात. जे रुग्ण एचआयव्हीग्रस्त नाहीत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ज्यांना दर सहा महिन्यानी रक्त तपासणी करण्याचे सांगितले जाते त्यांना समुपदेशक शेंडे अपमानास्पद वागणूक देतात. शासनाने एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि समाजात या रुग्णांना सन्मानाने जगता यावे म्हणून विविध उपाययोजना केल्या आहे. या रुग्णांना मानसिक अथवा शारीरिक त्रास होवू नये सर्व प्रमुख ग्रामीण रुग्णालयातही एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन केंद्र स्थापन केले आहे. याकरिता आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. या रुग्णांबाबत संवेदनशिलता बाळगण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहे. केवळ रुग्णच नाहीतर याकरिता काम करणारे स्वयंसेवक, चाचणी करुन घेणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी समुपदेशकाची असते. मात्र आर्वी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत समुपदेशकाकडून यासर्व निर्देशांना धुडकाविण्यात येत असल्याचा प्रत्यय येत आहे. नियमित चाचणी करायला येणाऱ्या रुग्णांना किंवा खबरदारी म्हणून चाचणी करणाऱ्यांना शेंडे तासन्तास बसवून ठेवतात. दोन-तीन तासानंतर त्यांची चाचणी केली जाते. त्यानंतर त्यांना अद्वातद्वा बोलले जाते. अशाप्रकारे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातो. यापूर्वी समुपदेशक शेंडे यांची आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने त्याच्या वागणुकीत कोणतीच सुधारणा नाही. या तक्रारीची दखल घेत आरोग्य प्रशासनाने यावर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. कारवाईकडे अनेकांक्जे लक्ष लागून आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
समुपदेशकाची बदली करावी
By admin | Published: October 05, 2014 11:11 PM