अविनाश आदिक : गोजी येथील कृषी प्रदर्शनाचा समारोपवर्धा : शेती व्यवस्थेत जोपर्यंत बदल घडत नाही व अंमलात येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पोषक ठरणार नाही. केंद्र, राज्य शासनाने प्रश्न सोडविण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन एस.टी. कामगार काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र कृषक समाजाचे सदस्य अविनाश आदिक यांनी केले.महाराष्ट्र कृषक समाज व श्रीक्षेत्र मालखोदी महादेव देवस्थान यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित गोजी (जामणी) येथील कृषी व पशु प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब गावंडे यवतमाळ, कृषक समाज अध्यक्ष अनुराधा आदिक, कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक बाबाराव झलके, स्वाती देशमुख, प्रा. स्वप्नील देशमुख, माजी जि.प. सदस्य जिजा राऊत, माजी पं.स. सभापती शरयू वांदिले, बेबी वानखेडे, चंदा वानखेडे, संजय काकडे आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. त्याचा शेतीव्यवस्थेवर परिणाम होत आहे. हे गांभीर्य लक्षात घेत काम केले पाहिजे. महाराष्ट्र कृषक समाज संघटना राजकीय उद्देशाने पूढे आली नाही. दिवंगत गोविंदराव आदिक यांनी सरकारमध्ये असताना शासनाविरूद्ध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले. कृषक समाजही शेतकऱ्यांकरिता कार्यरत राहणार आहे, असे ग्वाहीही अविनाश आदिक यांनी दिली. गावंडे यांनी देशातील प्रत्येक गावात रेल्वे पोहोचत नाही तरी रेल्वेचा अर्थसंकल्प आहे; पण भारत कृषीप्रधान देश असताना कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नाही, अशी खंत व्यक्त केली. राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्तीच मृत झाली असून शेतकऱ्यांना क्रांतीशिवाय पर्याय नाही, असे परखड मतही त्यांनी मांडले. प्रास्ताविकातून काकडे यांनी गोविंद आदिक यांच्या ११ कलमी सनदेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांची सुत्ररूपाने मांडणी व उपाययोजना होती; पण सरकारने दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी आत्महत्येने जटील स्वरूप धारण केले आहे. ही तीव्रता कमी करायची झाल्यास डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रा. देशमुख व स्वाती देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. संचालन संजय काकडे यांनी केले तर आभार पांडुरंग देवतळे यांनी मानले. कार्यक्रमाला विनोद पांडे, अंबादास वानखेडे, प्रमोद पिंपळे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
शेती व्यवस्थेमध्ये बदल घडणे गरजेचे
By admin | Published: March 14, 2016 2:15 AM