सेलू : तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या येळाकेळी गावाचा कारभार सद्यस्थितीत प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. येथील ग्रामस्थांना दाखला मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. येथे कायमस्वरुपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय, वीजवितरण व तलाठी कार्यालय प्रभारी झाले आहे. येळाकेळी येथील वीज वितरण कार्यालयात गत काही महिन्यापासून अभियंता नाही. आंजी(मो.) येथील अभियंत्याकडे प्रभार देण्यात आला असल्याने विद्युत संबंधीत तक्रार असल्यास ग्रामस्थासह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. येथील तलाठी पद प्रभारी आहे. क्षीरसमुद्र येथील तलाठ्याकडे प्रभार दिला आहे. पशुवैद्यकीय कार्यालय प्रभारी झाली आहे. पशुधन पर्यवेक्षक हे पद प्रभारी अधिकारी आहे. त्यामुळे गोपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. ग्रामविकास अधिकारी पूर्णवेळ आहे. मात्र त्यांच्याकडे रेहकी, मोही या गावाचा ग्रामसेवक पदाचा कार्यभार आहे. या गावातील महत्त्वपूर्ण विभाग प्रभारी असताना येथे कायमस्वरुपी अधिकारी नियुक्त करीत नसल्याने ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे.(शहर प्रतिनिधी)
प्रभारी अधिकाऱ्यांवर येळाकेळी गावाचा कारभार
By admin | Published: June 10, 2015 2:22 AM