पोषण आहार चळवळ : जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वर्धा : महिला व बालकल्याण अंतर्गत अंगणवाडीसाठी राज्यस्तरावर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत उपक्रम राबविण्यात आला. यात रिलायन्सद्वारे जिल्ह्यात वर्धा तालुक्यातील आजगाव अंगणवाडी, आर्वी तालुक्यातील टाकरखेडा अंगणवाडी आणि सेलू तालुक्यातील हिंगणी अंगणवाडी केंद्रांनी तयार केलेल्या परसबागेला तथा संत लहानुजी महाराज देवस्थान टाकरखेडा यांनाही उत्कृष्ट परसबागेचा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा महिला बाल विकास व ग्रामविकास विभागाद्वारे यशवंत चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथील सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, दादाजी भुसे, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनीता वेद सिंगल, असिम गुप्ता, आयुक्त लहुराज माळी, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रतिनिधी इंद्रा मालो आदी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील पोखर्णी अंगणवाडी केंद्राने सेंद्रीय पद्धतीने निर्माण केलेल्या परसबागेला राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर जळगाव जिल्ह्यातील पद्मालय (मुगपाट) येथील अंगणवाडी केंद्राला दुसऱ्या क्रमांकाचे व पुणे जिल्ह्यातील जळगाव (सुपे) येथील अंगणवाडी केंद्राला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. वर्धा तालुक्यातील आजगाव अंगणवाडी केंद्राच्या पर्यवेक्षिका मंगला खेकारे व सेविका साधना वानखेडे, आर्वी तालुक्यातील टाकरखेडा अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका ललिता आसटकर व सेविका छाया पेठे, सेलू तालुक्यातील हिंगणी अंगणवाडी केंद्राच्या पर्यवेक्षिका ज्योती धनविज व सेविका मनीषा मोहर्ले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. पोषणआहार चळवळ अंतर्गत संपूर्ण उपक्रम पावडे यांच्या मार्गदर्शनात जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेसरे यांच्या पुढाकारातून राबविले गेले.(कार्यालय प्रतिनिधी)
वर्धा, सेलू, आर्वीच्या अंगणवाडीतील परसबागेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार
By admin | Published: March 13, 2017 12:47 AM