हिंगणघाट (वर्धा) : रस्त्याचे मोजमाप करताना मोजमाप पट्टीचा विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय बालमजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० मिनिटाच्या सुमारास लाडकी शिवारात घडली. रोहित विलास मोहिते रा. नागरी असे मृत बालकाचे नाव आहे.
सविस्तर वॄत्त असे की, हिंगणघाट- नागरी रस्त्यावर लाडकी शिवारात रेल्वे पुलाचे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावर हा बालक कामाला होता. मोजमाप करताना नकळत त्याच्या हातातील लोखंडी मोजमाप पट्टीचा स्पर्श विद्युत वाहून नेणाऱ्या तारांना झाला. या स्पर्शामुळे युवक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेनंतर नागरी गावात शोककळा पसरली. मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतक बालकाचे पार्थिव न नेण्याचा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतक बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्याने हा तणाव वाढतच गेला. घटनेनंतर दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार आणि ठाणेदार मारोती मुळुक यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मध्यस्ती करुन तणाव शांत केला. या रस्ताचे बांधकाम सुरू असतांना कंत्राट कंपनीकडून सुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. तसेच कामगाराचा विमा सुद्धा नसल्याचा आरोप नागरी येथील गावकऱ्यांनी केलेला आहे. याबाबत मृतकाचे नातेवाईकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे.