वर्धा : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी बालविवाह करुन तिचे शोषण केले. मात्र, युवकाचे अपघातात निधन झाले अन् पीडिता ही गर्भवती राहिल्याने हे बिंग फुटले. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसात दिली असता पोलिसांनी मृतक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पीडितेला रुग्णालयात उपचारार्थ पाठविले.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक १८ वर्षीय युवकाची ओळख १६ वर्षीय मुलीशी झाली. दोघांत मैत्री फुलली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. युवकाने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर बाहेर जिल्ह्यात तिला घेऊन जात तिच्याशी लग्न केले. दोघेही बाहेर जिल्ह्यातच वास्तव्यास होते. काही दिवसांनी ते पुन्हा हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात वास्तव्य करु लागले.
दोघांनी लग्न केल्याने घरच्यांनीही पोलिसात तक्रार देणे टाळले. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. पण, बालविवाह कायद्याने गुन्हा ठरत असल्याने दोघांच्या मनातही भीती होती. १४ मार्च रोजी १८ वर्षीय युवक कामावर गेला असताना त्याचा ट्रॅक्टर अपघातातमृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या अगदी काही दिवसांनंतर पीडितेची प्रकृती बिघडली. दरम्यान, ती गर्भवती असल्याचे समजले. मात्र, अल्पवयीन असल्या कारणाने रुग्णालयात उपचार करण्यास ती जाऊ शकत नव्हती. अखेर तिने थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून सर्व आपबिती पोलिसांसमोर कथन केली. तिची कहाणी एकूण पोलीसही आवाक् राहिले. अखेर पोलिसांनी मृतक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात केला विवाह
मृत युवक आणि अल्पवयीन मुलीची ओळख फेसबुकवर झाली. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. २०२१मध्ये दोघेही एकमेकांना भेटले अन् दोघांचेही सूत जुळले. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ६ जुलै २०२१ रोजी मृतक युवकाने पळवून नेत यवतमाळ येथील एका गावात जात तेथील मंदिरात देवाला साक्षी मानून बालविवाह आटोपला.
तक्रार देण्यास घरच्यांनी केली होती टाळाटाळ
अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिला गर्भवती केल्याने घरच्यांनीही ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली. दोघांचाही संसार चांगला सुरु होता. मात्र, अचानक युवकाचे अपघाती निधन झाल्याने पीडिता ही इतर कुठल्याही रुग्णालयात उपचारार्थ जाऊ शकत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला हे विशेष.