मध्यरात्री दोन वाजताच उजाडतो त्यांचा दिवस : म्हाताऱ्यांना घरी सोडून येतात कामाकरिता अरविंद काकडे आकोली साखर कारखानदारी उद्योगतला महत्त्वाचा घटक म्हणजे ऊसतोड कामगार. त्यांच्याशिवाय या कारखान्याचे चाक फिरत नाही. हालअपेष्टा सहन करीत ऊसतोड कामगार कारखाना क्षेत्रात वेठबिगारीचे जिणे जगतो आहे. घरात म्हाताऱ्यांना ठेवून, मुलांच्या शाळांना तिलांजली देवून हा कष्टकरी माणूस ऊसाच्या फडात राबतो. त्यांच्या मुलांचे बालपण असे भटकंती करण्यातच जात आहे. या कामाचा मोबदला साधारण असल्याने संसाराची घडी बसविताना चांगलीच कसरत करावी लागते, अशी व्यथा कामगार व्यक्त करतात. टिचभर पोट भरण्यासाठी हा ऊसतोड कामगार मुकादमाचा करार असेल त्या कारखान्याची वाट धरतो. हिंगोली, परभणी, लातूर, पुसद आदी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार ठरलेल्या कारखान्यावर येताना घरातील वयोवृद्ध आई वडीलांना घरी ठेवून येतात. बैलांवर जिवापाड प्रेम करणारा हा कामगार कोंबडे, शेळ्या, गाई आणि लहान मुलांना घेऊन कारखाना परिसरात पाल टाकून वास्तव्यास येतो. या मुलांच्या शिक्षणावर तुळशीपत्र टाकून मुलांना सोबत आणतात. यात अनेकांचे शिक्षण अर्धवट राहत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे या कामगारांच्या पिढ्यानपिढ्या कामगार म्हणून काम करीत असल्याचे पाहायला मिळाले. या कामगारांचा दिनक्रम सामान्यांप्रमाणे नसल्याचे दिसून येते. पहाटे २ वाजता उठून कामगार स्वयंपाक केला जातो. भाकरी-भाजी बांधली की, घरातील चिल्यापिल्यांना घरीच ठेवून ऊसाचा फड गाठून ऊसतोडणी केली जाते. बैलगाडी भरल्यावर कारखानाव्या वाटेने लागली कामगार देखील ऊसावर बसूनच जेवण करतात. या काळात त्यांची मुले पुंजांना काढतात. काम झाले की पाल टाकलेल्या परिसरात खेळतात. काळजावर दगड ठेवून कामगार त्यांच्या लहानग्यांना घरी ठेवून जात असले तरी जिवाला हुरहुर लागली असते असे ते सांगतात. आकोली परिसरात असलेल्या कारखाना साईटवर भेटलेली अंकीता अशोक करांडे वर्ग ४, अनिकेत दयानंद दिपरकर वर्ग ४, मीनाक्षी परसराम भुसारी वर्ग २ व लक्ष्मी शिवा शिंदे वर्ग ३ यासह विविध मुले दिवाळीच्या सत्रानंतर शाळेत गेलेली नाही. मात्र ऊसाचा हंगाम सुरू झाला की, शाळेवर तुळशीपत्र ठेवून आई-वडीलांमागे कारखानास्थळी जावे लागते. येथे त्यांच्या हातातील पुस्तक, पेन जावून केरकचरा, शेण काढणे नशिबी येते. लहान मुलांचे बालपण या ऊसाच्या फडात करपताना दिसून येत आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून विविध योजना राबवित आहे. मात्र या कामगारांच्या मुलांना अशी अर्धवट शाळा सोडावी लागत असून यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यांनाही शिक्षणाचा हक्क आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना आपला जिल्हा, गाव, शाळा सोडून यावे लागते. अशी शेकडो मुले शिक्षणापासून वंचिर राहत आहे. या मुलांना कारखाना परिसरातील शाळेत प्रवेश दिल्यास अनेकांना शिक्षण पूर्ण करता येईल. यातील अनेक बालकांना अर्ध्यावर शिक्षण सोडण्याची वेळ येईल. कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत काळजावर दगड ठेवून अंधाऱ्या झोपडीत अश्रूंना वाट मोकळी करून देत दिसत काढावे लागत असल्याचे एका कामगाराने बोलताना सांगितले. कामगारांच्या शाळाबाह्य झालेल्या मुलांना स्थानिक शाळेत प्रवेश देण्याची तरतुद आवश्यक अहोरात्र काबाडकष्ट करूनही मुकादमाकडून घेतलेल्या रक्कमेइतकी ऊसतोड एका दिवशी होत नाही. त्यामुळे मानहानीसह शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ऊसतोड कामगार सांगतात. अशात मुकादम कधी बैलजोडी विकतो तर कधी दमदाटी केली जाते. आमच्या नशिबाची अशी थट्टा होत असल्याची खंत काही कामगारांनी बोलून दाखविली. साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झालेल्या या कामगारांच्या मुलांची वाताहत थांबवायची असल्यास त्यांना स्थानिक शाळेत प्रवेश देण्याची तरतुद करावी. जेणेकरुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या मुलांना अर्ध्यात शाळा सोडावी लागत असल्याने अनेकांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करता येत नसल्याची खंत काही कामगारांनी यावेळी बोलून दाखविली.
ऊसाच्या फडात करपतेय बालपण
By admin | Published: January 05, 2017 12:37 AM