आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘आई’ या दोन अक्षरांमध्ये दडलेले संगीत आणि ओलावा अनुभवण्याची संधी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात सादर झालेल्या ‘आभाळमाया’ या आईवर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने वर्धेकरांना दिली. ‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही’, असं आईचं मनोगत कार्यक्रमातून व्यक्त झालं असलं तरी आपल वय विसरून उपस्थित ज्येष्ठांनीही सर्व कलावंतांना भरभरून दाद दिली. विदर्भ साहित्य संघ शाखा आणि स्वर-ताल संगत परिवाराद्वारे प्रस्तुत या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी संपूर्ण सभागृह व्यापून टाकले होते.मैफलीचा प्रारंभ वृंदावनासमोर सादर झालेले ‘शुभंकरोती म्हणा मुलांनो’ या डॉ. भैरवी काळे हिने गायलेल्या गीताने झाली. मैफलीत सादर झालेल्या सुमधूर गीतांनी उपस्थितांना कधी प्रेरणा दिली तर कधी हळवे केले. भैरवीसोबत अर्श चावरे या बालगायकाने सादर केलेल्या ‘एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई’ या गीताने सभागृह भावुक झाले. अनघा रानडे यांच्या ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ किंवा ‘निज माझ्यास नंदलाला’ या गीतांनी गतस्मृतींना उजाळा दिला. नितीन वाघ यांच्या स्वरातील ‘तुझे सब है पता मेरी माँ’ तसेच ‘माई तेरी चुनरिया लहारायी’ या गीतांनी वातावरण निर्मिती केली.सुनील रहाटे यांनी सादर केलेल्या ‘बीज अंकुरे अंकुरे’ तसेच ‘ओ मां तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी’ या गीतांनी रसिकांची दाद मिळविली. डॉ. सायली इंगळे हिने सादर केलेल्या ‘तू कितनी अच्छी है’ या गीतासोबतच गर्भातील मुलीचे मनोगत व्यक्त करणाºया ‘माँ तेरी ममता का आँचल सुख पाने दे’ या गीताने उपस्थित भारावले. तर मयूर पटाईत या युवा गायकाने सादर केलेल्या ‘आई भवानी तुझ्या कृपेने’ या मातृशक्तीचा जागर करणाºया गोंधळाने सभागृहात चैतन्य निर्माण केले. सर्वदा जोशी हिने ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आहे’ हे गीत मधूर स्वरात सादर केले. भैरवी काळे हिने ‘खोप्यामंदी खोपा सुगरनीचा चांगला’, नितीन वाघ यांनी ‘देवतुल्य माझे बाबा, देवतुल्य आई’, सुनील रहाटे यांनी ‘ओ माँ तुझे सलाम’ ही गाणीही सुरेल आवाजात सादर केली.भारत भू ला नमन करीत अनघा रानडे व गायकवृंदाने सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने मैफलीची सांगता झाली. संगीत संयोजक श्याम सरोदे, विठ्ठल दानव (तबला), प्रशांत उमरे, बंटी चहारे (सिंथेसायझर), सूरमणी वसंत जळीत (व्हायोलीन), राजेंद्र झाडे (आॅक्टोपॅड), बिट्टू भट (गिटार) या कलावंतांनी उत्कृष्ट साथसंगत करीत मैफलीत रंगत आणली. श्रेया लोखंडे, वेदांत ठाकरे, सम्यक पोफळी या बालकतावंतांनी सहगायकाची भूमिका समर्थपणे पेलली. निवेदिका पल्लवी पुरोहित यांनी बालपणीच्या खट्याळपणाला उजाळा देत मैफल फुलविली.या मैफलीचे उद्घाटन सहभागी कलावंतांच्या मातांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य जयंत मादुस्कर, प्रदीप बजाज, गौरीशंकर टिबडेवाल, प्रा. पद्माकर बावीस्कर, डॉ. पुरूषोत्तम माळोदे, मीनल रोहणकर, सतीश बावसे, संगीता इंगळे आदींचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:20 PM
‘आई’ या दोन अक्षरांमध्ये दडलेले संगीत आणि ओलावा अनुभवण्याची संधी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात सादर झालेल्या ‘आभाळमाया’ या आईवर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने वर्धेकरांना दिली.
ठळक मुद्देस्वर-ताल व विदर्भ साहित्य संघाची ‘आभाळमाया’ मैफल