जिल्ह्याचा निकाल ८८.८६ टक्के : १५ हजार ८०२ पैकी १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी ८६.४८ इतकी होती. यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील अंकित अरविंद लुटे या विद्यार्थ्याने पटकाविला. त्याने ६५० पैकी ६२६ गूण (९६.३१ टक्के) प्राप्त केले. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयातीलच जय रवींद्र येडलवार हा जिल्ह्यातून दुसरा आला असून त्याला ६५० पैकी ६१५ गुण (९४.६२ टक्के) मिळाले तर जिल्ह्यातून तिसरा येण्याचा तसेच मुलींमधून पहिला येण्याचा मान गांधीग्राम कॉलेज वर्धा येथील अपूर्वा सुनील राठी हिने पटकाविला. तिला ६५० पैकी ६१४ (९४.४८) टक्के गूण मिळाले. पुढच्या करीअरसाठी महत्त्वाची परीक्षा ठरत असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ती बुधवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलआईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू झाली; पण स्मार्टफोनच्या जमान्यात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील एकूण १२४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १५ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १५ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ५५६ मुले तर ७ हजार ४६५ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९१.९८ टक्के तर मुलांची टक्केवारी ८५.५७ एवढी आहे. त्यामुळे एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची सरशी राहिली. विज्ञान शाखेतून यंदा ५ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ५ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ५ हजार ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ६ हजार ९८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी ५ हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत एकूण १ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी
By admin | Published: May 28, 2015 1:38 AM