वर्धा : जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चारही नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीनंतर शुक्रवारी विविध विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली आहे. आष्टी, समुद्रपूर, कारंजा व सेलू येथे झालेली ही निवडणूक शांततेत पार पडली. कुठेही या निवडणुकीत वाद झाला नसल्याचे दिसून आले. सर्वच विषय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. समितीची निवड करताना सर्वच पक्षाच्या सदस्यांना जागा देण्यात आल्याचे चारही पंचायतीत दिसून आले आहे. पहिल्यांदा अस्तित्वात आलेल्या या समितीतून जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येतील असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे.(लोकमत न्यूज)समुद्रपूर नगर पंचायतसमुद्रपूर - येथील नगर पंचायतीमध्ये प्रथम सभेमध्ये विशेष समित्याची स्थापना करून सभापतिपद जाहीर करण्यात आले. पाणी पुरवठा व स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती म्हणून गजानन राऊत यांची वर्णी लागली. ही समिती स्थापन करताना भाजपाचे तीन व राष्ट्रवादीचे एक आणि बसपाच्या एका सदस्याचा त्यात समावेश करण्यात आला. बांधकाम समितीचे सभापती म्हणून अकुंश आत्राम यांची निवड झाली. या समितीत भाजपाचे तीन, रा.कॉ. एक, शिवसेना एक मिळून पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी तारा अडवे यांची निवड झाली. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षा डगवार यांचा सहभाग आहे.सेलू नगर पंचायत येथील नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे अध्यक्ष म्हणून पंचायतीचे उपाध्यक्ष चुडामण हांडे यांची वर्णी लागली. या समितीत बसपाचे हिमंतअली शहा, अनिल देवतारे व दप्तरी गटाचे शैलेंद्र दप्तरी यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणून दप्तरी गटाच्या शैला शब्बीर, उपाध्यक्ष वैशाली पाटील तर समितीचे सदस्य म्हणून दप्तरी गटाच्या प्रेमा जगताप व जयस्वाल गटाच्या कल्पना कारवटकर यांची निवड झाली. स्थायी समितीत नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल, उपाध्यक्ष चुडामन हांडे, शैला शब्बीर सैय्यद व शैलेद्र दप्तरी यांचा समावेश आहे.कारंजा नगर पंचायत कारंजा (घा.) - येथील नगरपंचायतीत स्थायी समितीच्या सभापती म्हणून नगराध्यक्ष बेबीताई कठाणे यांनी निवड झाली. विकास व नियोजन समितीचे सभापती लक्ष्मीकांत भांगे, आरोग्य स्वच्छता, पाणीपुरवठा सभापती म्हणून उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांची वर्णी लागली. बांधकाम समिती सभापती म्हणून नरेश चाफले, शिक्षण व क्रीडा समिती सभापती सतीश इंगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला बुवाडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजलक्ष्मी शहा यांनी काम सांभाळले. त्यांना तहसीलदार जोशी यांनी सहकार्य केले. निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीला पंचायत समितीतील सर्वच सदस्य उपस्थित होते. येथे काँग्रेसची एकछत्री सत्ता असल्याने येथे निवडणुकीत कुठलाही वाद झाला नाही.आष्टी नगर पंचायतमध्ये समित्या गठितआष्टी - येथील नगरपंचायतीमध्ये सभापती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केले नसल्यामुळे निवडणूक अविरोध झाली. यामध्ये बांधकाम सभापती जयश्री मोकद्दम, महिला व बालकल्याण सभापती अनिता भातकुलकर, शिक्षण सभापती अली रिजवाना परवीन, उपाध्यक्ष हमीदखाँ यांच्याकडे पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य पद देण्यात आले. तसेच सर्व समित्या गठित करण्यात आल्या. यात सत्तारूढ गटाचे तीन, विरोध गटाचे दोन याप्रमाणे पाच सदस्यांची निवड झाली. आमदार अमर काळे यांनी सभापती पदाचे वाटप स्वत:ठरवून दिल्याप्रमाणे करण्यात आल्याची चर्चा नगरपंचायतीच्या आवारात होती.
न.पं.च्या सभापतींची निवड
By admin | Published: December 05, 2015 9:08 AM