हिंगणघाट : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.६) आलेल्या वादळामुळे वीज पुरवठा तब्बल १६ तास खंडित राहिला. यामुळे महावितरणची निष्क्रियता दिसून आली. खंडित विजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसोबत आता वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. विजेशिवाय सुविधा अपूर्ण ठरतात. यातच १६ तास वीज खंडित राहिल्यास नागरिकांना असह्य होते. याचा अनुभव जुन्या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी घेतला. शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने परिसरातील टिना उडाल्या, कच्ची छपरे पडली, वृक्ष कोलमडले, विजेचे खांब वाकले. यातच तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. एकदा खंडित झालेला हा वीज पुरवठा तब्बल १६ तास दुरूस्त होऊ शकला नाही. या प्रकारामुळे घरोघरी चालणारे कुलर, पाण्याची मोटर, टीव्ही, बल्ब या बाबी प्रभावीत झाल्या. या दिवशी रात्री अनेकांना झोपताही आले नाही. सायंकाळी ७ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. जुन्या वस्तीमध्ये वीज खंडित होणे, हा प्रकार नवीन नाही. वारंवार व अनेकदा रात्री वीज खंडित होत असल्याने काळोखात राहावे लागते. वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज खंडित होते. रविवारी पाच तास वीज पुरवठा खंडित होता. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
१६ तास खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By admin | Published: May 09, 2016 2:12 AM