लोकमत न्यूज नेटवर्क वणी : दिवाळी आहे, कपडे, सोने-नाणे खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारपेठेकडे निघाल. तुमच्याकडे ५० हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम असेल तर सावधान. तुमचे वाहन पोलिस नाक्यावर अडवतील, तपासणी होईल. रोख रक्कम आढळली तर तुम्हाला ती कोठून आली, याचे पुरावे द्यावे लागतील. पोलिसांचे समाधान झाले तर तुम्हाला सोडले जाईल, अन्यथा तुमची रक्कम जप्त करून त्यावर सुनावणी सुरू होईल.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता लागू आहे. या काळात आर्थिक उलाढालीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाचे संपूर्ण लक्ष राहणार णार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, नियम समजून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. तुम्ही अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार करावेत. तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी येत आहात आणि तुमच्याकडे रोख रक्कम आहे. तर ती कोठून आणली, याबाबतचे पुरावे जरूर सोबत ठेवावेत. जसे की, बँकेतून रक्कम काढली असेल तर पासबुक सोबत बाळगावे. दूध डेअरीचे बिल आले असेल तर त्याची पावती सोबत असावी. शेतमाल विकला असेल तर व्यापाऱ्याची पावती सोबत ठेवावी. काहीच सोबत नसेल तर किमान ते पैसे तुमचे कष्टाचेच आहेत हे सिद्धच करावे लागेल. जर सिद्ध करता आले नाही तर मात्र ती रक्कम जप्त केली जाईल. त्याची पावती दिली जाईल आणि त्यावर सुनावणी चालेल. पुढील एका आठवड्यात सुनावणीवर निर्णय घेतला जाईल. दिवाळीनिमित्त खरेदी हमखास असते. आता एक तोळा सोने घ्यायचे, तर ७० हजार रुपये लागतात. शेतकरी कुटुंबाकडे असणाऱ्या रोख रकमेला पावत्या कोठून आणायच्या, हा प्रश्न असतो. त्यामुळे दिवाळी खरेदीची अनेकांची पंचाईत होणार आहे. सामान्यांना आम्ही त्रास देणार नाही, शंका आली तर मात्र कायदेशीर कार्यवाही अटळ असेल, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
कॅमेऱ्यांसमोर होणार वाहनांची तपासणी तालुक्यात चार ठिकाणी पोलिसांनी चेकनाके उभे केले आहेत. वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या हद्दीत हे नाके आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तेथे कॅमेऱ्यांसमोर वाहनांची तपासणी होणार आहे. शिवाय, अन्यत्र तपासणी व चौकशी होत असताना एक कॅमेरामन पोलिसांसोबत असेल. तो त्या घडामोडी कॅमेराबद्ध करणार आहे.