लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डिजिटल प्रशासन, गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी असा गवगवा भाजपाचे राज्य शासन करीत आहे; पण आधारच्या अव्यवस्थेमुळे शेतकरी कर्जमाफी, शिष्यवृत्तीचे अर्ज, पेन्शन, पॅन कार्ड लिंक करणे आदी कामांत अडथळे येत आहेत. वर्धा जिल्ह्यात तर आधार कार्डच ‘इनव्हॅलीड’ दाखवित असल्याने कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.छत्रपती शिवाजी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. हे करीत असताना सर्वात महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ‘आधार कार्ड’ची नोंद आहे. आधार कार्ड नसेल, बायोमॅट्रीकमध्ये बोटांचे ठसे येत नसतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी स्थिती आहे. नेमके जिल्ह्यात हाच प्रकार अधिक होत असल्याचे दिसते. आधार कार्डची संकल्पना काँगे्रस शासन काळात समोर आली. त्यावेळी लगबगीने मोठ्या प्रमााणात आधार कार्ड काढण्यात आले. यात आधार कार्ड व क्रमांक ‘जनरेट’ही झाला; पण अनेकांच्या बोटांचे ठसे ‘बॉयोमॅट्रीक’ प्रणालीमध्ये ‘अपलोड’च झाले नाहीत. यामुळे त्यावेळी काढलेले बहुतांश आधार कार्ड आज ‘इनव्हॅलीड’ असल्याचे सांगत आहे. या प्रकारामुळे शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. कर्जमाफी, शिष्यवृत्ती, पेन्शन, इनकम टॅक्स, गॅस सिलिंडरची जोडणी यासह सर्वच कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे आहे; पण अनेकांचे आधार कार्ड इनव्हॅलीड सांगत असल्याने त्यांना पुन्हा आधार कार्ड काढण्यासाठी धडपड करावी लागत आहे.आधार कार्डमुळे भारतातील नागरिकांना एक नवीन आणि समान ओळख मिळाली होती; पण यातील घोळामुळे आधार असलेले नागरिकही निराधार झाल्याचेच दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आधार इनव्हॅलीड असलेल्या नागरिकांसाठी आता काय तोडगा काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किमान कर्जमाफीस पात्र वृद्ध शेतकºयांसाठी तरी वयाची मर्यादा ठरवून आधार सक्ती शिथील करणे गरजेचे झाले आहे.कर्जमाफीमध्ये आधारची आडकाठीकर्जमाफीचे लाभार्थी ठरलेल्या वृद्ध शेतकºयांची व्यथा यापेक्षाही वेगळी आहे. अनेक वृद्धांनी आधार कार्ड काढले आहे; पण बोटांचे ठसेच येत नाही. यामुळे ते कार्ड इनव्हॅलीड सांगत आहे. आता त्यांना नवीन आधार कार्ड काढावे लागत आहे. हे करीत असतानाही वृद्धापकाळामुळे बायोमॅट्रीक प्रणालीत बोटांचे ठसेच येत नाही. मग, आधार कार्ड निघणार कसे, हा प्रश्नच आहे. शिवाय जुने आधार कार्ड अपडेट करायचे झाल्यास ९० दिवस लागतात. मोबाईलवर आधारचे बायोमॅट्रीक अपडेट होण्यास २० दिवसांचा कालावधी लागतो. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत भरावयाचे आहेत. मग, शेतकºयांना कार्ड मिळणार कधी आणि अर्ज भरायचे कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे असंख्य शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार आहे.जिल्ह्यात केवळ चार केंद्रआधार कार्ड काढण्याकरिता जिल्ह्यात केवळ चार केंद्र कार्यरत आहे. यातही वैभव लोनकर नालवाडी व विविधा या दोनच केंद्रांवर बायोमॅट्रीक प्रणाली योग्यरित्या कार्यरत आहे. यामुळे वृद्ध, विद्यार्थी व नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शासनाच्या संकेतस्थळावर एन्रॉलमेंट एजेंसीची मोठी यादी असली तरी कुठे बायामॅट्रीक यंत्रणा निकामी तर कुणाचे संगणकच जप्त केले आहे. या प्रकारांमुळे आधार शोधताना नागरिकांची तारांबळ उडत आहे.शिष्यवृत्तीही अडचणीतशाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना आधारची सक्ती आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेवर आधार कार्ड काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. आधारसाठी केंद्रही मर्यादित असल्याने त्यांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळी रांगेत उभे झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत ताटकळावे लागते. आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे शुल्क २० रुपये ठरवून देण्यात आले आहे; पण सेवा केंद्रांमध्ये १५० ते २५० रुपये आकारले जात आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.शेतकºयांची व्यथाशंकर फकीराजी उडाण (८०) रा. आकोली यांच्याकडे साडे तीन एकर शेती असून ते कर्जमाफीस पात्र आहे. ते आधार कार्ड काढण्यास आले असता बायोमॅट्रीकमध्ये बोटांचे ठसे येत नाही. यामुळे कार्ड मिळत नाही. रामाजी शेंडे (८६), रामराव महादेव रामटेके (७५), पत्नी गंगाबाई रा. आकोली, राजकुमार हरबाजी करवाडे व त्यांच्या पत्नी मंजूळा यांच्याकडे आधार आहे; पण बोटांचे ठसे येत नाही. मग, अर्ज कसा भरणार हा प्रश्नच आहे.इनव्हॅलिड आधार कार्डआधार कार्ड तयार करण्याची योजना सुरू झाली त्यावेळी केवळ कार्ड जनरेट करण्यावर भर देण्यात आला. यात नागरिकांचे कार्ड तर जनरेट झाले; पण त्यांचे बायोमॅट्रीकच घेण्यात आले नाही. श्याम गुलामराव दरणे रा. चाणकी (कोरडे) ता. हिंगणघाट, श्याम बबनराव जावरकर रा. खामगाव यांचे आधार कार्ड इनव्हॅलीड दाखवित आहे. त्यावेळी बोटांचे ठसेच घेतले नसल्याने हा प्रकार घडत आहे. धनराज राजेश मोठे, शितल विनोद दसोडे, अभिनव रेमेश फटींग, किशोरी मधुकर भट या विद्यार्थ्यांनाही चार दिवसांपासून चकरा माराव्या लागत आहे.बायोमॅट्रीक अपडेट होण्यासाठी ९० दिवस तर मोबाईलवर बायोमॅट्रीक अपडेट होण्यास २० दिवस लागतात. जिल्ह्यात केवळ चार केंद्र असून दोन केंद्रांवर बायोमॅट्रीक प्रणाली कार्यरत आहे. यामुळे दिवसरात्र काम करावे लागत असून नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.- वैभव लोनकर, संचालक, एन्रॉलमेंट एजेंसी, नालवाडी, वर्धा.कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पती-पत्नी दोघेही हजर पाहिजे. आधार कार्डमुळे येणाºया अनेक अडचणी येत आहे. याबाबत जनजागृतीही करण्यात आली नाही. शिवाय वृद्धांच्या बोटांचे ठसेच येत नसल्याने अडचण आहे. शासनाने वयोमर्यादा ठरवून आधार कार्डची अट शिथिल करणे गरजेचे आहे.- मिलिंद भेंडे, माजी जि.प. सदस्य, वर्धा.
‘आधार’च्या घोळाने नागरिक ‘निराधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:31 PM
डिजिटल प्रशासन, गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी असा गवगवा भाजपाचे राज्य शासन करीत आहे; पण आधारच्या अव्यवस्थेमुळे शेतकरी कर्जमाफी, ....
ठळक मुद्देपंगू यंत्रणेमुळे लाभार्थी संकटात : वृद्धांच्या बोटांचे ठसेच येत नाही