लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूगर्भातील पाण्याची पातळी ०.७२ मीटरने वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. मागील काळात सर्वेक्षणासाठी ११२ विहिरीचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले होते. गत ४ वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात बऱ्यापैकी समाधानकारक पाऊस झाला. तर यंदाही मान्सून वेळीच दाखल होऊन निश्चितच समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज विविध प्रकारच्या हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणीटंचाईतून दिलासा मिळणार आहे.
यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात थोडा थोडा पाऊस कोसळला, यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कोठेतरी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जलाशयात समाधानकारक जलसाठा तयार झाला. अर्थात आष्टी तालुक्याची स्थिती चिंताजनक राहील, असेही भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात गंभीर जलसंकट आले होते, त्यावेळी वर्धा शहरासह तेरा गावासाठी खरांगणा येथील महाकाली धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची अतिशय उचल करावी लागत होती. तसेच आर्वीच्या काही गावात तत्कालीन वेळी पाण्याची समस्या गंभीर बनली होती. चारही वर्ष वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत जास्तच पाऊस कोसळला होता शिवाय यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस झाल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सर्वेक्षणाअंती भूगर्भातील अपेक्षित जलसाठा ०.४१ मीटरपर्यंत वाढला होता. मार्च व एप्रिल महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मागील ५ वर्षाच्या तुलनेत यंदा ०.७२ मीटरने भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याचे पुढे आले आहे.
भूजल पातळीत झाली वाढभूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने झालेल्या सर्वेक्षणात वर्धा तालुक्यातील पाणी पातळी १.५५ मीटरने वाढली. आष्टी तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी ०.७९ मीटरने खालावली आहे. कारंजा तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी ०.१३ मिटरने वाढल्याचे सांगण्यात आले आहे. आर्वीच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी आपल्या वर्धा जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी आष्टी वगळता सर्वच तालुक्यात वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पाणी हे आपले जीवन असून पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करून, दैनंदिन जीवनात पाण्याची काटकसर केली पाहिजे, आवश्यक तितकाच पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. भविष्यात पाणी आपल्याला जपून वापरावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने जीवनात संकल्प करून पाण्याचा आम्ही अपव्यय करणार नाहीत, अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे, भविष्यात आपल्याला पेट्रोलच्या भावात पाणी विकत घ्यावे लागेल, असे संकेत दिसून येत असले तरीही आजपासून आपण अतिरिक्त पाणी भूगर्भात जाण्यासाठी आपल्या घराच्या भागात गड्ढेकरून पाणी जमिनीत मुरवावे.- अविनाश टाके, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.
निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी हे आपले भविष्याचे जीवन असल्याने पाण्याचा वापर दैनंदिन जीवनात जपून करावा. वसुंधरेच्या पोटातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने, आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यासाठी जलपुनर्भरण शोषखड्यात जिरवून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- उमेश आसटकर, आर्वी पर्यावरण अभ्यासक.