लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - २२ ऑगस्ट हा वर्धा शहरपक्षी दिन असून दोन वर्षांपूर्वी वर्धानगरीचा शहरपक्षी ठरविण्याकरिता पक्ष्यांची निवडणूक आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या या आगळ्यावेगळ्या निवडणुकीचा निकाल २२ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आला. या निवडणुकीत तब्बल ५२ हजार वर्धेकरांनी मतदान केले होते. त्यात 'भारतीय नीलपंख' हा पक्षी सर्वाधिक मतांनी निवडून आला. या शहरपक्ष्याचे शिल्प वर्धा नगरीत उभारले जावे, याकरिता बहार नेचर फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केला होता. बहारच्या या मागणीला यश आले असून, शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेला आहे. बहारने या घोषणेचे स्वागत करीत शहर व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले असून कार्यकारिणी सभेत अभिनंदन करणारा ठराव पारित करण्यात आला आहे.
वर्धा नगरपरिषद आणि बहार नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही निवडणूक महाराष्ट्रातली दुसरी तर विदर्भातली पहिली निवडणूक होती. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षी व पक्ष्यांचे महत्त्व विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न बहारने केला. या निवडणुकीचा निकाल ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला होता. या अनोख्या पर्यावरणीय उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतलेली आहे. शिवाय, या उपक्रमापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील अनेक शहरांनी शहरपक्षी निवडणुकीचे आयोजनही नंतरच्या काळात केले आहे.दि. ५ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान राज्यभरात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने नुकताच घेतलेला आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात पक्षी सप्ताह साजरा केला जाईल. या पाशर््वभूमीवर शहरपक्षी नीलपंखाचे शिल्प येत्या पक्षी सप्ताहापर्यंत उभारण्याची मागणी बहार नेचर फाऊंडेशनद्वारे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे.
नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या परिसरात नीलपंख पक्ष्याचे चित्र तसेच विविध पक्ष्यांची माहिती प्रदर्शित करून शहरपक्षी दिवस साजरा करावा, असे आवाहन बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्कि. रवींद्र पाटील, सचिव दिलीप वीरखडे, सहसचिव राहुल तेलरांधे, कोषाध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, सदस्य संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने, वैभव देशमुख, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, अतुल शर्मा, दर्शन दुधाने, राहुल वकारे, अविनाश भोळे, विनोद साळवे, राजेंद्र लांबट, सुनंदा वानखडे, सुभाष मुडे, हरीश इथापे, डॉ. गोपाल पालीवाल, दीपक साळवे व बहारच्या सर्व सदस्यांनी केले आहे.पक्षीज्ञान फलकाचे लोकार्पणबहार नेचर फाऊंडेशनद्वारे शहरपक्षी दिनानिमित्त शनिवारी सकाळी ८ वाजता स्थानिक हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या ऑक्सिजन पार्क परिसरात पक्षीज्ञान फलक उभारून हा दिवस साजरा केला जाईल. या स्थायी स्वरुपाच्या फलकावर शहरपक्षी नीलपंख तसेच अन्य पक्ष्यांचीही संक्षिप्त माहिती देण्यात येणार आहे.