वर्धा : महापुरुषांच्या स्पर्शाने पवित्र झालेला, तसेच बापूंची कर्मभूमी असलेला जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. बापू नेहमीच अहिंसेच्या मार्गावर चालले. त्यामुळे शांतीप्रिय जिल्हा म्हणूनदेखील वर्ध्याची ओळख आहे. मात्र, ‘वर्चस्ववाद’ अन् ‘भाईगिरी’मुळे शांतीप्रिय जिल्ह्याला ‘अशांत’ करण्याचा डाव काही समाजकंटकांकडून केल्या जात आहे.
अशीच घटना २६ रोजी सोमवारी रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड परिसरात घडली. दोन सशस्त्र टोळ्या आमने-सामने येऊन तलवारी अन् चाकू निघाले. दोन्ही गटातील तरुण गंभीर जखमी झाले. हा थरार रामनगरवासीयांनी डोळ्याने पाहिल्याने पुन्हा एकदा रामनगरात वर्चस्ववादातून गुंडाराज फोफावत असल्याचे चित्र आहे. रामनगर पोलिसांनी दोन्ही सशस्त्र टोळ्यांतील दहा जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमान्वये, तसेच दंगा भडकविल्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले.
एका गटातील आरोपी विशाल रमेश बादलमवार याला अटक केल्याची माहिती दिली, तसेच खुशाल किसन राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या गटातील रवी वाघाडे हा जखमी झाला असून, त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार करून सुट्टी दिल्याची माहिती आहे.
तुषार बादलमवार आणि बंटी राऊत यांच्या दोन वेगवेगळ्या संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. मागील काही वर्षांपासून दोन्ही टोळीत वर्चस्ववादातून वाद सुरू आहे. दोन्ही गटातील तरुणांकडून एकमेकांवर हल्ले करणे, हाणामारी करणे सुरूच राहत असल्याने अनेकदा दोन्ही टोळीतील वादाने पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढली आहे. रामनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळीतील सदस्यांविरुद्ध विविध कलमान्वये यापूर्वी गुन्हेदेखील दाखल आहेत.
सोमवारी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास संत तुकाराम वॉर्ड परिसरात जखमी खुशाल राऊत हा बंटी राऊत सोबत घरासमोर उभा असताना आरोपी विशाल बादलमवार हा काही युवकांसह तलवारी अन् चाकू घेऊन चारचाकीने आला आणि बंटी राऊतला मारहाण करू लागला. ही बाब खुशालला दिसताच त्याने मध्यस्थी जात वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता, खुशालच्या हातावर तलवारीने सपासप वार करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या गटातील विशाल बादलमवार आणि रवी वाघाडे हे आर्वी नाका येथे चहा पिण्यास गेले असता आरोपी बंटी राऊत यांने मित्रासह पाठलाग करून आर्वी नाका परिसरात रवी वाघाडे आणि विशाल बादलमवार याच्यावर सशस्त्र हल्ला केला. या घटनेमुळे रामनगर परिसरात पुन्हा एकदा गुंडाराज फोफावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
दोन्ही गटातील गुन्हेगारांवर काउंटर तक्रारी...
तक्रार १ : विशाल बादलमवार याने दिलेल्या तक्रारीत विशाल आणि रवी वाघाडे हे चहा पिण्यासाठी दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात असताना आरोपी बंटी राऊत, खुशाल राऊत, चिमन, संगम अमृतकर, राज अमृतकर यांनी पाठलाग केला. जुन्या वादातून विशालच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि रवी वाघाडेच्या पाठीवर, डोक्यावर व हातावर तलवारीने व रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली.
तक्रार २ : खुशाल राऊत याने दिलेल्या तक्रारीनुसार, खुशाल आणि त्याचा भाऊ बंटी हे दोघे घरासमोर उभे असताना आरोपी विशाल बादलमवार, अमोल गेडाम, तुषार बादलमवार, सौरभ गावंडे, रिहांश राजपूत हे पाच जण चारचाकीतून आले आणि हातात तलवार अन् चाकूसह रॉड घेऊन बंटी राऊत याला मारहाण सुरू केली. खुशाल राऊत वाद सोडविण्यास गेला असता, त्याला आरोपींनी तलवारीने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली.
दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव
दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांतील सदस्यांविरुद्ध रामनगर आणि वर्धा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तुषार बादलमवार, अमोल गेडाम, रिहांश राजपूत यांच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही हे विशेष.
दिवसभर हवेत गोळीबाराचीच चर्चा...
रामनगरात झालेल्या खुनी हल्ल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच खुशाल राऊत याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करतेवेळी हॉस्पिटल परिसरात तिसऱ्याच एका टोळीतील म्होरक्या त्याच्या मित्रांसह आला धुमाकूळ घालून हवेत गोळीबार केल्याची खमंग चर्चा मंगळवारी दिवसभर शहरात सुरू होती. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता, तो म्होरक्या काही दिवसांपासून एका गुन्ह्यात फरार असल्याची माहिती दिली. त्यामुळे खरंच गोळीबार झाला किंवा नाही, याबाबतची शहानिशा करण्याची गरज आहे.