वर्धा : पळसगाव (बाई) या गावाला नदीचा वेढा आहे. यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेर जाण्याकरिता नदीपात्राचा अडथळा पार करावा लागतो. यातच नदीपात्रालगत बेशरमच्या झाडांचा विळखा असून पुलाखाली गवत वाढलेले आहे. यामुळे पुराचा धोका संभवतो आहे. पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता करावी, या मागणीचे निवेदन पळसगाव(बाई) येथील नागरिकांनी प्रशासनाला दिले आहे.मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सिंदी (रेल्वे)सह परिसरातील गावांना बसला होता. यात पळसगाव येथील रस्ते व पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पुरात गावातील अनेक रस्ते खरडून गेले शिवाय पुलावर मोठा खड्डा पडला. नागरिकांनी हा खड्डा त्वरीत बुजवावा या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच शिवाय पुराचे पाणी वाहून जाण्यास अवरोध होत असल्यामुळे सर्वाधिक नुकसान सोसावे लागले. भविष्यात ही गैरसोय टाळण्यासाठी व पूराचा धोका पत्करण्याऐवजी बेशरमची झाडे व पुलाखाली वाढलेले गवत वेळीच कापल्यास पळसगाववासियांना याचा त्रास होणार नाही. पळसगाव(बाई) या गावात १० जुलै २०१३ रोजी आलेल्या पुरामुळे हाहाकार झाला होता. तीच परिस्थिती यंदाही उद्भवू नये म्हणून प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. नदीपात्रात वाढलेल्या वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि यामुळे पुराचे पाणी गावात शिरले. गावाला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पावसाळ्यात या मार्गाची वाहतूक ठप्प होते. थोडाही पाऊस आला की पाणी पुलावरुन वाहू लागते. परिणामी गावाचा संपर्क तुटतो. या समस्येची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
नदीपात्राची स्वच्छता करा
By admin | Published: June 24, 2014 12:03 AM